दुष्काळान समदं कुटुंब होरपळलं

दुष्काळान समदं कुटुंब होरपळलं

पुणे - ‘गावाकड शेत हाय, पण त्यात नुसती धसकट अन ढेकळ हाईत. माणसं, जनावरांना प्यायला पाणी मिळना, हंडाभर पाण्यासाठी दूर जावं लागतय. गावाकडं हाताला काम नाही म्हणून पुण्यात आलो. इथ कसं बसं चालयं, पाणी पडलं की परत जाऊ गावाकडं, या दुष्काळान समदं कुटुंब होरपळंय’’ अशा शब्दांत साठीकडे कललेल्या कंबळाबाई त्यांच्या दुष्काळाच्या वेदना सांगत होत्या. 

वारजेच्या मजूर अड्ड्यावर दुष्काळात होरपळलेली अनेक कुटुंबे भेटली. त्यापैकीच एक होत्या कंबळाबाई राठोड. मजूर अड्ड्यावर डोक्‍यावर पदर घेऊन बसलेल्या कंबळाबाईंची सैरभैर नजर कामाच्या शोधात होती. कोणी नवीन व्यक्ती दिसला की त्या काही काम हाय का? असे विचारत होत्या. काम लवकर मिळत नसल्याने त्याची चिंता चेहऱ्यावर दिसत होती. 

चौकशी केल्यावर घडाघडा बोलायला लागल्या. ‘‘पुण्यात येऊन १०-१२ दिवस झाले. त्यातले ४-५ दिवस काम मिळालं, बाकीचे दिवस बेकार गेले. मजूर अड्ड्यावरून रिकाम्या हातानं घरी जाव लागलं आहे. आज काम मिळालं तर बर होईल’’, असे म्हणत त्यांनी मोठा श्‍वास घेतला.  यंदा पाऊस कमी पडला. थोडी तूर, उडीद, मूग निघाली, पण आता काहीच नाही. शेतात धसकट आणि ढेकळ आहेत. जनावराला पाणी पाजवायचं म्हणलं तर विहीर नाही, तर तळ्याला जावं लागतय. तिथंही पाणी कमीच राहिलंय. घरात जेवढी माणसं जास्त तेवढं पाणी जास्त लागतंय, म्हणून कामाच्या शोधात पुण्यात आलो. यंदाचा दुष्काळ लई बेकार हाय,’’ असे विदारक वास्तव कंबळाबाईंनी चेहऱ्यावरील घाम पदराने पुसून सांगितले. 

त्यांच्याच शेजारी उदगीर तालुक्‍यातील नरगीळचे उत्तम पवार उभे होते. ते पुण्यात येऊन १४ दिवस झाले आहेत. ‘‘मी बायको, पोरांसह पुण्यात आलो, गावाकड मजुरी खूप कमी आहे. पुण्यात दिवसाला ६०० रुपये हजेरी आहे. महिन्यातून १५-२० दिवस काम मिळालं तरी बरं होईल. काही पैसे गावाकडे पाठवून दिले की दोन्हीकडं पण कसंतरी घर चालेल’’

Web Title: Water Shortage Drought

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com