कुत्र्याचे इंजेक्‍शन नाही...तुम्ही परत जा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

पुणे : ''रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे...कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जा आणि उद्या या... आता 'लंच ब्रेक' झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची अक्षरशः हाडतूड गाडीखाना (डॉ. कोटणीस) दवाखान्यातील 'नर्स' करतातच पण, त्यात तेथील वैद्यकीय अधिकारीदेखील मागे नाहीत, हे सोमवारी दुपारी पुढे आले. अखेर, महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी घेतलेल्या कानपिचक्‍यांमुळे अखेर रुग्णाला कुत्रे चावल्यानंतर अठरा तासांनंतर 'रेबिज'चे 'इंजेक्‍शन' मिळाले. 

पुणे : ''रेबिजचे इंजेक्‍शन संपले आहे...कधी येईल माहिती नाही... तुम्ही आत्ता जा आणि उद्या या... आता 'लंच ब्रेक' झाला... दोन वाजता या... अशी रुग्णांची अक्षरशः हाडतूड गाडीखाना (डॉ. कोटणीस) दवाखान्यातील 'नर्स' करतातच पण, त्यात तेथील वैद्यकीय अधिकारीदेखील मागे नाहीत, हे सोमवारी दुपारी पुढे आले. अखेर, महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी घेतलेल्या कानपिचक्‍यांमुळे अखेर रुग्णाला कुत्रे चावल्यानंतर अठरा तासांनंतर 'रेबिज'चे 'इंजेक्‍शन' मिळाले. 

कुत्रा चावल्याच्या प्रचंड वेदना एका बाजूला, त्या कुत्र्याला 'रेबीज' आहे की, नाही याचे 'टेन्शन' दुसरीकडे. अशा स्थितीत एकापाठोपाठ एक सरकारी दवाखान्यांच्या पायऱ्या चढूनही रेबिजचे इंजेक्‍शन मिळता मिळत नव्हते. ''कामानिमित्त सासवडला गेल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता कुत्रे चावल्या-चावल्या रविवारी मी ग्रामीण रुग्णालयात गेले. पण, तेथे 'उद्या या' या उत्तर मिळाले. सोमवारी सकाळी परत गेल्यानंतर इंजेक्‍शन आले नाही, 'दुपारी या' असे म्हणून परत पाठविले. कामासाठी पुण्यात जाणार असल्याने पुण्यातच घेऊ असे म्हणून स्वारगेटवरून थेट गाडीखाना गाठला''. पण, तेथे केस पेपर काढणाऱ्यांनेच परत घरी पाठवून देण्याची तयारी केली होती. कुत्रा चावलेला रुग्ण दवाखान्यात जाणारच नाही, आणि गेला तरीही त्याला इंजेक्‍शन मिळणार नाही, याची पुरेपूर व्यवस्थाच या रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्‍टरांनी केल्याचे येथे दिसून आले. ''कुत्र्याचे इंजेक्‍शन नाही. तुम्ही परत जा... उद्या या... अशा भाषेत तेथील नर्स बोलू लागल्या...'' ,हे सांगत असताना अनिता पवार असहाय्य झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते. 

गाडीखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर तर अत्यंत संतापजनक होते. ते म्हणाले, "कुत्रे चावलेल्या इंजेक्‍शनचा दहाचा कोटा होता. तो सकाळी संपला. दुसरा कोटा उद्या मिळेल. त्यामुळे तुम्ही उद्या सकाळी या.'' चोवीस तासात इंजेक्‍शन घेण्यासाठी पवार वणवण फिरत होत्या. त्यातून सरकारी रुग्णालयातून इंजेक्‍शनसाठी महिला वणवण फिरत असल्याची, त्यांची रुग्णालयात टोलवाटोलवी सुरू असल्याची माहिती "सकाळ'पर्यंत पोचली. त्यानंतर 'सकाळ'च्या प्रतिनिधीने थेट महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याकडे रुग्णाला घेऊन गेला. डॉ. हंकारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानपिचक्‍या घेतल्या आणि तातडीने रुग्णांना इंजेक्‍शन देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अखेर चोवीस तासांच्या आत रुग्णाला इंजेक्‍शन मिळाले. 

नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया 
रुग्णांना वेळेत इंजेक्‍शन देण्यात टाळाटाळ करणारे वैद्यकीय अधिकार आणि रुग्णांशी फटकून वागणाऱ्या नर्स यांच्यावर महापालिकेने कारवाई केली पाहिजे, असे तुम्हाला वाटते का? तुमचाही महापालिकेच्या रुग्णालयाबद्दल असाच अनुभव असेल, तर 9130088459 या व्हॅटस्‌ क्रमांकावर आम्हाला नक्की कळवा. तसेच, webeditor@esakal.com या इ-मेलवर किंवा @eSakalUpdate या ट्विटर हॅंडलवर आणि @SakalNews या फेसबुक पेजवर या घटनेबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. 

Web Title: a women did not get injection after dong bite


संबंधित बातम्या

Saam TV Live