वाचा, महाराष्ट्रात पावसाची कशी आहे परिस्थिती आणि कोणत्या विभागात मुसळधार पावसाचा इशारा

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020
  • मुंबई, ठाण्यावर मोठे ढग जमा
  • मुंबईवर 5 ते 6 किलोमीटरचे ढग
  • मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • पालघर, रायगडलाही मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्यानं नवा अलर्ट जारी केलाय. कारण या पट्ट्यात मोठ्य़ा प्रमाणावर ढग जमा झाल्याचं डॉप्लर रडारवर दिसून आलंय. मुंबई आणि ठाण्यावर तर 5 ते 6 किलोमीटर उंचीचे ढग साठल्याचं रडारवर दिसून आलंय. मान्सूनचेच हे ढग असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि रायगडसह पालघरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.  त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस या परिसरासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत.

तिकडे विदर्भातल्या नागपूर जिल्ह्यातील पेंच आणि कन्हान नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यानं या नदीकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरलंय. नागपूरमध्ये झालेल्या संततधार पावसामुळं जिल्ह्यातील पेंच, कन्हान आणि कोलार या नद्यांनी धोक्याची पातळी गाठलीय. तर मध्यप्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं चौराई धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळं या धरणातील पाण्याचा विसर्ग सुरूय. या धरणातील पाणी पुढे नागपूर जिल्ह्यातल्या पेंच आणि नवेगाव खैरी या धरणांमध्ये येतं. त्यामुळं ही धरणं सुद्धा ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूय. परिणामी पेंच आणि कन्हान नद्या दुथडी भरून वाहतायत...या नदीकाठच्या मौदा आणि कन्हान-कामठी तालुक्यातील काही गावं पाण्याखाली गेलीयत. या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय.

भंडाऱ्यात मुसळधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. वाढती पाणी पातळी लक्षात घेता गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडण्यात आलेयत. आज दिवसभरात 5 वेळा दरवाजे उघडण्याची स्थिती बदलण्यात आलीय. 7 दरवाजे 4 मीटरने उघडलेयत. तर 26 दरवाजे साडेतीन मीटरने उघडण्यात आलेयत. 23 हजार 383 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, 2005 सालानंतर पहिल्यांदाच 2020 मध्ये दरवाजे उघडण्यात आलेयत. यामुळे गडचिरोली जिल्ह्याला धोका निर्माण होऊ शकतो. नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

गोंदिया जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातलाय. यामुळं जिल्ह्यातल्या नद्या दुथडी भरुन वाहताहेत. अनेक नद्यांना पूर आलेत. अशाच पुरात ८ जण अडकले होते. या ८ जणांना स्थानिकांनी वाचवलंय. जिरुटोला गावात वैनगंगा नदीला पूर आलाय. या पुरात गावातले ८ ग्रामस्थ अडकले होते. हे कळताच स्थानिकांनी रेस्क्यु ऑपरेशन सुरु केलं. आणि आपली जीवाची बाजी लावून या आठही जणांना बाहेर काढलं.


संबंधित बातम्या

Saam TV Live