पावसाची कुठे कशी परिस्थिती; महाराष्ट्रातली पावसाची खबरबात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सोमवारपर्यंत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे

पुरात वाहुन गेल्या तब्बल 1 हजार 89 बक-या 

गडचिरोलीत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात तब्बल 1 हजार 89 बक-या वाहुन गेल्यात. गेल्या दोन दिवसापासुन दक्षिण गडचिरोली जिल्हयाला पावसाने झोडपुन काढलंय. या तालुक्यात राजाराम खांदला परिसरात चंद्रपुर जिल्हयातल्या मेंढपाळानी बक-या चरण्यासाठी आणल्या होत्या... अतिवृष्टीने राजाराम खांदलालगतच्या सुर्यापल्ली नाल्याला पुर आला आणि या भागात असलेल्या 1 हजार 89 बक-या पुरात वाहुन गेल्या. 

धोम धरण संपूर्ण भरले

सातारा जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सतत कोसळणा-या पावसामुळे धोम धरण संपूर्ण भरले असून 13.5 टीएमसी इतका पाण्याचा साठा झालाय, त्यामुळे 9557 क्युसेक पाण्याचा कृष्णा नदीत विसर्ग सुरू आहे. नदी दुथडी भरून वाहतेय. वाईच्या गणपती मंदिरातही पाणी घुसलं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

अमरावतीत मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळलेली 

अमरावतीत मुसळधार पावसामुळे घराची कोसळलेली भिंत पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जवळपास २० ते २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, असं असताना दुसरीकडे मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्याला झोडपून काढलं. अशात चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील डोबानपुरा भागात पावसामुळे घराची भिंत कोसळली. घराची कोसळलेली भिंत पाहून ६२ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अशोक शेकोकार असं मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

नवापुर तालुक्यात पावसाने पाच जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात पावसाने पाच जणांचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसाने तालुक्यातील सरपणी, रंगावली नद्या दुधडी भरुन वाहत आहे. नवापुर शहारातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यामुळे नवापुर तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत झालाय. पाणाबारा गावाजवळ पुल खचल्याने अमरावती सुरत महामार्गावरची वाहतुक विसरवाडी पासुन नंदुरबारकडे वळवण्यात आलीय.. पावसाच्या पाण्यानं पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

WebTitle : marathi news rain updates of maharashtra 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live