पवारांची मुलाखत महाराष्‍ट्रासाठी की मनसेसाठी ?

अशोक सुरवसे
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

राज-पवार मुलाखतीतून काय मिळालं? 
पवारांच्‍या मुलाखतीतून काय मिळालं?
राज ठाकरेंनी पवार उलगडले की... ? 

राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली आणि महाराष्‍ट्राच्‍या राजकीय पटलावर एक नवा पायंडा सुरु झाला. याचं काही अंशी कौतुक तर काही अंशी टीकाही सुरु झाली. या मुलाखतीतून नेमकं काय निघालं, यापेक्षा या मुलाखतीच्‍या निमित्तानं प्रत्‍येक जण आपआपला अजेंडा रेटण्‍याचाच प्रयत्‍न कसा करु लागला, हे ठळकपणे दिसून आलं. 

राज-पवार मुलाखतीतून काय मिळालं? 
पवारांच्‍या मुलाखतीतून काय मिळालं?
राज ठाकरेंनी पवार उलगडले की... ? 

राज ठाकरेंना नेमकं काय करायचं होतं ?

व्‍यासपीठ एकाचं, मुलाखत दुस-याची आणि अजेंडा मात्र राज ठाकरेंचा असंच काहीसं चित्र बुधवारच्‍या पुण्‍यातल्‍या कार्यक्रमातनं पाहायला मिळालं. समाज माध्‍यमांप्रमाणंच सर्वसामान्‍यांनीही या ऐतिहासिक क्षणाचा प्रचंड गाजावाजा केला होता. तो होणंही स्‍वाभाविक होतं...कारण एका पक्षाचा अध्‍यक्ष दुस-या पक्षाच्‍या अध्‍यक्षाची जाहीर मुलाखत घेणार होता. ही मुलाखत फिक्‍स नाही, असा प्रचार संयोजकांनीही जोरकसपणे केला होता. त्‍याचा परिणामही दिसून आला. मुलाखतीचा ऑन ग्राऊंड इव्‍हेंट हाऊसफुल्‍ल झाला, तर मराठी दूरचित्रवाहिन्‍यांनीही विदाऊट ब्रेक दोन-अडीच तासाचा हा इव्‍हेंट साजरा केला. सकाळी दैनिकांचे रकानेही याच मुलाखतीनं भरल्‍याचं पाहायला मिळालं. हे सारं होणारच होतं. मुलाखतीतले प्रश्‍न पाहता ते पवारांना आधीच कळवले होते, असं वाटतही नव्‍हतं. पण असं असतानाही पवारांसारखा तेल लावलेला पैलवान राज ठाकरेंच्‍या हाताला लागलेला दिसला नाही. असं असलं तरी काही ठिकाणी पवार राज ठाकरेंच्‍या जाळ्यात अडकल्‍याचं चित्र पाहायला मिळालं. 

पवारांची एन्‍डोर्समेंट घ्‍यायची होती ?

आपण विचारत असलेले प्रश्‍न महाराष्‍ट्राला पडलेले प्रश्‍न असं राज वारंवार अधोरेखित करत होते. पण सारेच प्रश्‍न तसे नव्‍हते. त्‍यातले काही प्रश्‍न राज ठाकरेंना आणि त्‍यांच्‍या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेलाच पडलेले प्रश्‍न होते, हे कोणीही सांगू शकेल, असेच होते. मग तो स्‍वतंत्र विदर्भाचा प्रश्‍न असो की मुंबईला महाराष्‍ट्रापासून कथित स्‍वरुपात वेगळं करण्‍याबाबतचा प्रश्‍न असो. या सा-या प्रश्‍नांना पवारांचं उत्तर मिळवून आपल्‍या आणि आपल्‍या पक्षाच्‍या भूमिकेवर शिक्‍कामोर्तब करण्‍याचाच प्रयत्‍न राजनी केला असं दिसतंय. 

खरं तर राज ठाकरे महाराष्‍ट्राला आतापर्यंत माहिती नसलेले शरद पवार उलगडून दाखवतील, असं वाटत होतं. काही काही प्रश्‍नांच्‍या मांडणीवरुन तसा थोडासा प्रयत्‍न झाल्‍याचं दिसलंही. पण राज ठाकरेंनी आपल्‍याच भूमिकेला एन्‍डोर्समेंट मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नांसमोर, ते प्रयत्‍न खूपच धूसर ठरले, हे नक्‍की!


संबंधित बातम्या

Saam TV Live