वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक, मिशांचे केस केले जप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

रामटेक - रामटेक येथील गडमंदिर परिसरात वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींजवळून वाघाच्या मिशांचे ५१ केस जप्त करण्यात आले आहे. आरोपींच्या छिंदवाडा येथील घरातून इतरही अवयव जप्त केल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. 

रामटेक - रामटेक येथील गडमंदिर परिसरात वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींजवळून वाघाच्या मिशांचे ५१ केस जप्त करण्यात आले आहे. आरोपींच्या छिंदवाडा येथील घरातून इतरही अवयव जप्त केल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. 

रविवारी गडमंदिर परिसरात काही व्यक्ती वाघाच्या अवयवांची तस्करी करीत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार सायंकाळी गडमंदिराच्या वाहनतळावर सहायक वनसंरक्षक विशाल बोऱ्हाडे, रामटेकचे वनपरिक्षेत्राधिकारी श्रावण खोब्रागडे, क्षेत्रसहायक डी. आर. अगडे, वनरक्षक स्वरूप केरवार, पंकज कारामोरे, व्ही. वाय. उगले, के. वी. बेलकर यांनी सापळा रचला. या सापळ्यादरम्यान तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या दुचाकीची तपासणी केल्यावर टुलबॉक्‍समध्ये वाघाच्या मिशांचे ५१ केस आढळून आले. यावरून रामदास भंगू चव्हाण (वय ३५, रा. टुकूरमाल, ता. चांद जि. छिंदवाडा), तारासिंह शिवप्रसाद राठोड व भिकम जितसिंह राठोड (वय ३१, रा. बादलपार, जि. शिवनी) या तिन्ही आरोपींना अटक करण्यात  आली. 

तपासादरम्यान आरोपींनी वाघाचे इतर अवयव त्यांचे घरी लपवून ठेवले असल्याचे सांगितले. ही माहिती वनविभागाने छिंदवाडा वनविभागाला अधिकाऱ्यांना दिली. तेथील अधिकाऱ्यांनी रात्रीच आरोपींच्या घरून वाघाचे इतर अवयव जप्त केले. सोमवारी आरोपींना न्यायालयाने १० मेपर्यंत वनकोठडी सुनावली. 

गेल्या पाच वर्षांपूर्वी रामटेक परिसरातच मध्य प्रदेशातील शिकाऱ्यांना पकडल्यानंतर अनेक वाघांचे शिकारी वन विभागाने ताब्यात घेतले होते. यामुळे या आरोपींकडूनही वाघांच्या शिकारीची माहिती उघड होण्याची शक्‍यता आहे. या शिकाऱ्यांचा बहेलियाशी संपर्क होता का याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला यांच्या मार्गदर्शनात विशाल बोऱ्हाडे, श्रावण खोब्रागडे करीत आहेत.

Web Title: Tiger Body Party Smuggling Crime


संबंधित बातम्या

Saam TV Live