फडणवीस, तावडेंची वक्तव्यं आणि नियतीने घेतलेला सूड

फडणवीस, तावडेंची वक्तव्यं आणि नियतीने घेतलेला सूड

आयुष्यात काहीही झालं तरी तुमचं कर्म, कोणत्याही परिस्थितीत तुमचा पाठलाग सोडत नाही. याचा प्रत्यय प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात येत असेलच पण, आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्याबाबतीत हे प्रकर्षाने जाणवत आहे. दोन्ही नेते पाच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम प्रकाशझोतात होते. पण, त्या काळात सभागृहात त्यांनी केलेली दोन वक्तव्य आणि त्यांची सध्याची असलेली अवस्था बरचं काही सांगून जाते. 


काय बोलले होते फडणवीस?
मुंबईत आज शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथ विधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. ज्या जागी उद्धव ठाकरे उभे होते तिथं उभं राहण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांना मिळाली असती पण, राजकारणात एक पाऊल मागं जाण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही. परिणामी त्यांना या सोहळ्याला पहिल्या रांगेत बसावं लागलं. आज, विधानसभेत विरोधीपक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी टाकण्यात येत आहे. त्याचवेळी फडणवीस यांचे सभागृहातील एक वक्तव्य आठवते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन, थेट भाजपमध्येच प्रवेश केला होता. त्यांच्या जागी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली. ज्यावेळी वडेट्टीवार यांनी विरोधीपक्षनेता म्हणून, सभागृहात कामकाज सुरू केले. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांचे सभागृहात अभिनंदन केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी, 'वडेट्टीवार तुम्ही विरोधीपक्षनेतेपदाचं कामकाज नीट समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. आणखी पाच वर्षे घ्या,' अशा आशयाचे वक्तव्य केले होते.

फडणवीस यांनी जणू पुन्हा काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागणार आहे, असेच त्यांना म्हणायचे होते. त्यांच्या वक्तव्यावर त्यावेळी भाजप सदस्यांमध्ये हशाही पिकला होता. विधानसभा निवडणूक प्रचारातही फडणवीस यांचा अतिआत्मविश्वास सगळ्यांनाच दिसत होता. महाराष्ट्रात विरोधीपक्षाच शिल्लक नाही, शिल्लक राहणार नाही, अशी वक्तव्यं ते भाषणांमधून करत होते. पण, नियतीने असा काही सूड घेतला की, पुढच्या काही दिवसांतच स्वतः फडणवीस यांनाच विरोधीपक्ष नेते व्हावे लागले. 

काय बोलले होते विनोद तावडे?
विधानसभेतील कामकाजा दरम्यान, तात्कालीन मंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. सभागृहाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आव्हाड यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तावडे यांनी, 'त्यांना बोलू द्या, पुन्हा ते या सभागृहात येतील की नाही सांगता येत नाही,' असे वक्तव्य केले होते. आव्हाड यांनी त्याचवेळी सभागृहात तावडे यांना आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. एखाद्या मंत्र्याला असे आव्हान दिल्याबद्दल, आव्हाड यांनी नंतर एका मुलाखतीत खेदही व्यक्त केला होता. तसेच आपण, त्या प्रसंगानंतर तावडे यांची वैयक्तिक माफीही मागितल्याचं आव्हाड यांनी सांगितलं होतं. आजच्या घडीला आव्हाड सभागृहाचे सदस्य आहेत, किंबहुना त्यांना एखादं मंत्रिपदही मिळण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडं तावडे यांचा पत्ता तिकिट वाटपातच कापला गेलाय. आज तावडे विधिमंडळातील कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.

Web Title: raviraj gaikwad writes about devendra fadnavis and vinod tawde statements

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com