तिलारी घाटातील वाहतुक 15 जूलै पर्यंत बंद राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जुलै 2019

कोकण, गोव्याच्या बाजारपेठेवर परीणाम...
कोकण आणि गोव्याला लागणारा भाजीपाला बेळगाव बाजारपेठेतून आयात केला जातो. त्यासाठी तिलारी घाट हा जवळचा असल्याने या मार्गावर सतत वर्दळ होती. घाटातील वाहतुक बंद केल्यामुळे पुढचे दहा दिवस आंबोली मार्गे वाहतुक करावी लागणार आहे. 

चंदगड - महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याला जोडणाऱ्या तिलारी घाटात काल पावसाने रस्ता खचला. घाटाच्या मध्यवर्ती रस्त्याचा सुमारे 20 मीटर बाय 2.5 मीटरचा भाग पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असून त्या ठिकाणी घळ तयार झाली आहे. सुरक्षितता म्हणून पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेट्‌स लावून वाहतुकीला मज्जाव केला आहे. बेळगाव, कोल्हापूर, कोकण, गोव्याला जोडणारी वाहतुक ठप्प झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 15 जूलै पर्यंत या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तिलारी जलविद्युत प्रकल्पासाठी म्हणून बांधला गेलाला 7.200 किलो मीटरचा हा घाट अशास्त्रीय मानला जातो. केवळ बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची ने - आण करणे एवढाच हेतू होता. त्यामुळे त्या ठिकाणाला जोडणारा रस्ता एवढाच उद्देश ठेवून तो बनवण्यात आला आहे. शास्त्रीय निकष न वापरल्याने नागमोडी वळणे, एकाचवेळी यु आकाराचे वळण आणि त्याचवेळी चढ किंवा उतार अशी धोकादायक स्थिती असल्याने या मार्गावरुन सार्वजनिक वाहतुकीला परवानगी नव्हती. मात्र कोकण आणि गोव्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गावर सतत वर्दळ होती.

चंदगड, बेळगाव, राधानगरी, कोल्हापूर आगाराच्या गाड्या या मार्गावरुन धावत असत. खासगी वाहतुकही मोठ्या प्रमाणात होती. अनेक वर्षे हा रस्ता पाटबंधारे खात्याच्या अख्त्यारीत असल्याने दुरुस्ती नव्हती. गतवर्षी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आला.

या वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्याची डागडुजी करण्यात आली. परंतु गुरुवारी (ता. 4) रात्री पावसाने रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. 20 मीटर लांब आणि 2.5 मीटर रुंदीचा भाग घसरुन घळ तयार झाली आहे. सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दहा दिवसाचा कालवधी लागणार असून आज पासून 15 जूलै पर्यंत वाहतुक बंद ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान येथील पोलीसांनी घाटाच्या सुरवातीला बॅरीकेट्‌स लावून तसेच मध्ये दोन ठिकाणी अडथळे निर्माण करुन वाहतुकीस मज्जाव केला आहे. कोकण हद्दित दोडार्माग पोलिसांनीही घाटातील वाहतुक थांबवली आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live