पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन लांबणार...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पोलिस अधिवेकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यंदा २ आठवडे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

नागपूर : पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन जवळपास दोन आठवडे लांबणार असल्याने त्यांना दुहेरी आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. मार्चच्या वेतनातून 50 टक्‍के वेतन कापणार असल्याने ट्रेझरी ऑफिसला लेखाजोखा करण्यात बराच वेळ जात असल्याने पोलिसांवर उसनवारीची वेळ आली आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार वेतनात 25 ते 50 टक्‍के कपात करून टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पोलिस विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. अपेक्षित नसताना अचानक अर्धा पगार मिळत असल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली. आता मार्च महिन्याचा पगार मिळण्यास जवळपास 20 एप्रिलपर्यंतचा अवधी लागण्याची शक्‍यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांवर दुहेरी संकट 
नागपूर पोलिस आयुक्‍तालयाने येणाऱ्या आर्थिक संकटातून वाचण्यासाठी पोलिस उपायुक्‍त विक्रम साळी यांनी तातडीने निर्णय घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांची बिले 28 तारखेलाच ट्रेझरी विभागात पाठविली होती. त्यामुळे पोलिसांचा पगार वेळेवर होण्याची खात्री होती. मात्र, राज्य शासनाने अचानक पगार कपातीचा निर्णय घेतल्याने अडचण निर्माण झाली होती. वर्ग एक आणि दोन अधिकाऱ्यांचे 50 टक्‍के तर वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 25 टक्‍के वेतन कापण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अधिकाऱ्यांना तर काहीही फरक पडला नाही. मात्र, वर्ग तीनमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. वेतन कपातीच्या निर्णयाने गृहिणींचे बजेट बिघडले. मुलाबाळांवर करण्यात येणाऱ्या खर्चालाही कात्री बसली. दोन आठवडे वेतन होणार नसल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खदखद आहे. 
 
पोलिस, आरोग्य विभागाची गळ 
कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढाईत आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाने खांद्याला खांदा लावला. आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यामुळे या दोन्ही विभागांतील कर्मचाऱ्यांना वेतन कपातीच्या निर्णयातून वगळण्यात यावे, यासाठी काही कर्मचारी संघटना तसेच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला होता. यावर राज्य शासन गांभीर्याने विचार करेल, अशी आशा होती. मात्र, वेतन कपातीचा निर्णय सरसकट लागू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला. 

जपून खर्च करा 
मार्चचे अर्धेअधिक वेतन हाती येणार असल्याने काटकसरीचे नियोजन करण्यात आले. त्यातही आता थेट 20 एप्रिलपर्यंत पगार होणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस कर्मचारी हवालदिल आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर खदखद व्यक्‍त केली. तर, काहींनी सबुरीचा सल्ला देऊन काटकसरीने खर्च करण्याचे आवाहन केले आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live