"शिवसेनेनं भाजपचा मेक अप उतरवला" अग्रलेखातून भजपवर जहरी टीका

 "शिवसेनेनं भाजपचा मेक अप उतरवला" अग्रलेखातून भजपवर जहरी टीका

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांचे निकाल नुकतेच लागले आणि भाजपचा मोठा पराभव निदर्शनास आला. नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वर्चस्व असूनही भाजपला सगळ्यात मोठी हार ही नागपूरमध्ये स्विकारावी लागली. त्यामुळे भाजपवर सगळीकडून टीका होतेय. धुळे सोडता भाजपला कुठेच समाधानकारक विजय मिळवता आला नाही. राज्यातील सत्ता गेली तशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असलेली भाजपची पकडही निसटली. सत्ता हेच भाजपचे टॉनिक होतं आणि तेच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूजही उतरली अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.  

महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सामनातून भाजपवर जोरदार टीका होत असते. आता तर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे भाजपनेच वाढून ठेवल्याने सामनाचा रोजचा अग्रेलख हा विरोधी पक्षावर टीका करणाराच असतो. भाजपने महाराष्ट्रातील सत्ता गमावली आणि त्यासोबतच जिल्हा परिषदाही गमावल्या. सगळीकडे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तर काही ठिकाणी वंचित आघाडी विजयी झाली आहे. तब्बल सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजप हद्दपार झाली आहे. आता भाजप काय करणार, असा सवाल सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे. 

असा आहे आजचा 'सामना'चा अग्रलेख...
जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची पीछेहाट झाली आहे. एक धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील ‘मेकअप’ उतरला. सत्तेमुळे आलेली ही लाली सत्ता जाताच उतरली. ज्याच्या हाती बऱ्यापैकी सत्ता असते त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांत विजय होतो. राज्यात सत्ताबदल झाल्याची तुतारी सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालांनी फुंकली आहे. नंदुरबारची सत्ता भाजपने गमावली आहे. त्याचे नैराश्य इतके की, अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेली.

या सर्व जिल्हा परिषदांवर कालपर्यंत भाजपची सत्ता होती, पण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या. कुठे शिवसेना, कुठे राष्ट्रवादी, तर कुठे काँग्रेस आणि वंचित आघाडीची सरशी दिसत आहे. पण धुळे वगळता भाजप कुठेच नाही. सगळ्यात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपचा दारुण पराभव फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला. शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही फडणवीस-गडकरी तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचे कारण एकच, ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या ‘बकवास’ थापेबाजीला कंटाळली आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपुरात मुसंडी मारलीच होती व आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली.

नागपुरातील पराभव हा सगळ्यात मोठा दणका आहे. नागपुरात जिथे जिथे फडणवीस प्रचाराला गेले तिथे तिथे भाजप उमेदवारांचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे? नागपुरात ५८ पैकी ४० जागांवर काँग्रेस – राष्ट्रवादीने विजय मिळवला हे महत्त्वाचे आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे.

Web Title: Samna editorial criticized BJP for ZP election loss

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com