सांगलीच्या ब्रम्हनाळमध्ये बचावादरम्यान 16 जण बुडाले; दुर्घटनेतील बळी पुराचे की व्यवस्थेचे ?

सांगलीच्या ब्रम्हनाळमध्ये बचावादरम्यान 16 जण बुडाले; दुर्घटनेतील बळी पुराचे की व्यवस्थेचे ?

सांगली : गेल्या काही दिवसांपासून कृष्णा-कोयना नद्यांच्या महापुराने सांगलीत हाहाकार उडविला असून, आज (बुधवार) हा पूर तब्बल 16 जणांच्या जीवावर उठला. सांगलीजवळील ब्रह्मनाळ येथे बचावकार्य करताना बोट उलटल्याने 16 जण वाहून गेले. यातील 9 जणांचे मृतदेह सापडले असून, 7 जण बेपत्ता आहेत. 

सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रह्मनाळ गावातून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना बोट उलटून 16 जण वाहून गेले आहेत. सांगलीतील पलुस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात महापूर आला आहे. पुरात अडकलेल्या 30 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून बोट पाठवण्यात आली होती. ब्रम्हनाळपासून खटावकडे या नागरिकांना नेण्यात येत होते. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली.

पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही बोट उलटली आणि नागरिक पुराच्या पाण्यात पडले. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्यात हे सर्वजण बुडाल्याची शक्यता आहे. 16 जण बेपत्ता असून, यातील 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अन्य सात जणांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, एक लहान मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे. सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून या भागात बचावकार्य राबविण्यात येत आहे. 

Web Title: 16 peoples feared dead in Sangli Brahmanal flood boat capsize

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com