हुतात्म्यांसाठी सांगलीत कडकडीत बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

सांगली : जम्मू काश्‍मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सांगली नि:शब्द झाली. शहरात कडकडीत बंद पाळून दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला. स्टेशन चौकात मोठ्या संख्येने सांगलीकरांनी एकत्र येवून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. 

सांगली : जम्मू काश्‍मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सांगली नि:शब्द झाली. शहरात कडकडीत बंद पाळून दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला. स्टेशन चौकात मोठ्या संख्येने सांगलीकरांनी एकत्र येवून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज "आम्ही सारे भारतीय...' या बॅनरखाली सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि विविध संघटनांनी सांगली बंदचे आवाहन केले होते. हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी स्टेशन चौकात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आज सकाळी साडे नऊपासून सर्व पक्षीय नेते, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक एकत्र येण्यास प्रारंभ झाला. यावेळी "पाकिस्तान मुर्दाबाद...', "शहीद जवान अमर रहे !' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

महापौर संगिता खोत, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांच्या उपस्थितीत साडेदहा वाजता श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेळी दोन मिनिटे भोंगा वाजवल्यावर श्रध्दांजलीसाठी शहर स्तब्ध झाले. यावेळी जिल्हाधिकारी काळम पाटील यांनी नागरिकांना प्रतिज्ञा दिली.

देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी राहण्याची ग्वाही दिली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आपले जवान योग्यवेळी या घटनेचा नक्कीच बदला घेतली. आपले लष्कर खूप ताकदवान आहे. आपण त्यांच्या पाठिशी राहू, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी जिल्हा पोलिस दलाचा एक दिवसाचे वेतन हुतात्मा जवानांसाठी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. शहरातील सराफ बाजार पेठ, मारुती रोड, कापडपेठ, व्यापार पेठ आणि मार्केटयार्ड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. 

दिवसाचे वेतन हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी एक दिवसाचे वेतन मदत म्हणून देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी जाहीर केला. यावेळी त्यांनी सारा देश जवानाच्या कुटुबियांच्या दुःखात सहभागी असून, त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची भावना व्यक्त केली.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live