सांगलीत शेतकरी पुत्रांसाठी भरणार वधू-वर मेळावा

सांगलीत शेतकरी पुत्रांसाठी भरणार वधू-वर मेळावा

सांगली - ‘ती’ व्यासपीठावर येते. स्वतःचा परिचय करून देते. नवरा कसा असावा, याविषयी अपेक्षा व्यक्त करते. शेवटचे एकच वाक्‍य बोलते, ‘थोडी शेती पाहिजेच; पण तो शेतकरी नको’... एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापकापेक्षा जास्त उत्पन्न घेणारा, बुलेटवरून फिरणारा आणि दारात ट्रॅक्‍टर, बोलेरो उभा करणारा भूमिपुत्र हिरमुसतो... 

अशा नवयुवक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वधू-वर मेळावा घेण्याची परंपरा मलिकवाड (जि. कोल्हापूर) येथे सुरू करण्यात आलीय. त्याला सांगली जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळतोय. ‘आयटी’त नाही, पण ऐटीत आहे, अशी लक्ष वेधून घेणारी शेतकरी पुत्रांची जाहिरात करत हा मेळावा होतोय. यंदा दुसरे वर्ष असून २४ फेब्रुवारीला हा मेळावा भरणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न, हा जटील प्रश्‍न बनलेला असताना या प्रकारचा प्रयत्न कौतुकाचा विषय ठरला आहे. 

चिक्कोडी तालुक्‍यातील मलिकवाड हे परिवर्तनाचे केंद्र आहे. तेथील श्री १००८ मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर आणि श्री वीराचार्य अल्पसंख्यातर सौहार्द संस्था बेडकिहाळ यांचा पुढाकार आहे. त्यातील मूळ प्रश्‍नाला भिडण्याची मानसिकता अधिक महत्त्वाची आहे. येत्या २४ ला ऐलाचार्य अरुणसेन सभागृहात होणारा हा मेळावा एका अर्थाने प्रश्‍नाला भिडण्याचे धाडसी पाऊल आहे. नव्या पिढीतील तरुणी शेतकरी नवरा नको, या मानसिकतेत आहेत. शेती हवी, सोबत नोकरी हवी, शहरात निवास हवा, अशा अटींमुळे शेतकरी इच्छुक वरांसमोरील संकट वाढले आहे. विशेषतः जैन समाजात या प्रश्‍नाने मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे संयोजकांनी हा प्रयत्न केला आणि गेल्यावर्षी त्याला चांगले यश आले.

शेतकरी नवरा नको गं बाई म्हणणाऱ्या ३० मुलींनी काही शेतकरी तरुणांचे अर्थकारण, त्यांची जीवनशैली समजून घेतल्यानंतर होकार दिला. हाच प्रयत्न सातत्याने करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे रावसाहेब पाटील, रावसाहेब कुन्नुरे यांनी सांगितले.

Web Title: Bride-groom program for farmers in sangli

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com