सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्यासाठी काँग्रेस नेत्यांचे मल्लिकार्जून खर्गेंना साकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

सांगली - येथील लोकसभेची जागा अन्य पक्षांसाठी सोडली जाण्याच्या चर्चेने अस्वस्थ झालेल्या काँग्रेस नेत्यांनी थेट महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनाच साकडे घातले. सांगलीची जागा अन्य कोणालाही देऊ नये, अशी गळ घातली आहे. यावर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागून राहीले आहे.

सांगली - येथील लोकसभेची जागा अन्य पक्षांसाठी सोडली जाण्याच्या चर्चेने अस्वस्थ झालेल्या काँग्रेस नेत्यांनी थेट महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनाच साकडे घातले. सांगलीची जागा अन्य कोणालाही देऊ नये, अशी गळ घातली आहे. यावर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागून राहीले आहे.

दरम्यान, सांगलीची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडण्याच्या चर्चेने संतप्त कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस समितीसमोर एकच गर्दी केली. सांगलीची जागा सोडली तर पक्ष कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. 

स्वाभिमानी पक्षाचे नेते खासदार राजू शेट्टी महाआघाडीकडे तीन जागा मागत आहेत. त्यांना यापूर्वी हातकणंगले देण्यात आली आहे. मात्र अन्य दोन जागा देण्यास काँग्रेस तयार नाही म्हणून त्याबदल्यात सांगली स्वाभिमानीस देण्याचा निर्णय अंतिम पातळीवर सुरू आहे. दरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आज या निर्णयास जोरदार विरोध केला आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था पाचोळ्यासारखी झाल्यानंतर गेली पाच वर्षे बरीच मरगळ निर्माण झाली होती. यंदाची निवडणूक आचारसंहीता लागू झाली तरी काँग्रेसचा पैलवान अजुनही ठरलेला नाही. भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची फक्‍त औपचारिकता बाकी आहे.

त्यांना तोडीस तोड उमेदवार शोधण्याची काँग्रेसची धडपड सुरु आहे. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पक्षाचे शहर-जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी आपण इच्छूक नसल्याचे कळविले आहे.

आमदार विश्‍वजीत कदम यांनी लोकसभा लढवावी असाही आग्रह आहे, पण ते इच्छूक नसल्याचे समजते. त्यातच दादा व कदम गट हा वादही येथे अडथळा आहे. पराभवाचे पाणी सपाटून प्याल्यानंतरही काँग्रेसजनांत सुजाणतेची चिन्हे नाहीत. या दुहीची व कमकुवतपणाची दखल पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरुन घेतली गेल्याची चर्चा आहे. सुरवातीला नगरच्या बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली जाण्याची चर्चा होती.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापर्यंत अदलाबदलीचे वादळ पोहचल्यानंतर त्यांनी या बदलाला स्पष्ट नकार दिला असला तरी सांगलीच्या राजकीय वर्तुळात वादळ पुर्ण शमलेले नाही. हातची संधी जाण्याच्या भितीने काँग्रेसजनांनी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जऊून खर्गे यांच्याकडे धाव घेतली आहे.

जिल्हाध्यक्ष ( ग्रामिण ) आमदार मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, आमदार विश्‍वजीत कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, कार्यकारीणी सदस्या जयश्री पाटील, कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसने सांगलीची जागा 2014 चा अपवाद करता कधीही गमावलेली नाही. जिल्ह्यात तळागाळापर्यंत पक्षाची मुळे पसरली आहेत. जागावाटपात पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत; यामुळे संघटन खिळखिळे होण्याची भिती आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांत कॉंग्रेसची मतांची टक्केवारी चांगली आहे. महापालिकेला जरी काँग्रेस हारली तरी मतांची टक्‍केवारी चांगली आहे. त्यामुळे ही जागा सोडली तर येथील कॉंग्रेसच संपली असल्याचा संदेश जाईल. ही जागा लढवून जिंकण्याचा निर्धार कॉंग्रेसजनांनी केला आहे; त्यामुळे राष्ट्रवादी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडू नये, असे या पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Sangli Lok Sabha constituency congress agitation for seat


संबंधित बातम्या

Saam TV Live