`उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?`संजय काकडेंचा सवाल

सरकारनामा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

पुणे : राज्यसभेच्या जागांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता दिसत आहे. महाराष्ट्रातून सात जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. भाजपकडून माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र पक्षाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय, असा सवाल विचारला आहे. त्यांच्यापेक्षा मी पक्षाच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न केले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

पुणे : राज्यसभेच्या जागांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता दिसत आहे. महाराष्ट्रातून सात जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होणार आहे. भाजपकडून माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र पक्षाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय, असा सवाल विचारला आहे. त्यांच्यापेक्षा मी पक्षाच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न केले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

काकडे यांनी खुद्द उदनयराजेंवरच शाब्दिक तलवार उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या उदयनराजेंना राज्यसभेवर घेण्याचा शब्द भाजपने दिल्याचे बोलले जात आहे. यावर काकडे यांनी सांगितले की मी पक्ष संघटनेसाठी काय प्रयत्न केले आहेत, हे वरिष्ठांना माहिती आहे. मी पक्षाच्या उपयोगाचा आहे, असे त्यांना वाटत असेल तर ते माझ्या नावाचा नक्की विचार करतील. पुण्यातील विधानसभेच्या जागा येण्यासाठी मी किती कष्ट घेतले आहेत, हे अनेकांना माहिती आहे. शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट येथे भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. पुणे महापालिकेत पक्षाची सत्ता आणण्यासाठी विविध योजना राबविल्या होत्या. त्यामुळे पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची जबाबदारी माझ्यावर होती. तेथेही मी काम केले आहे. या साऱ्याचा विचार पक्षाचे नेते राज्यसभेची उमेदवारी देताना करतील, असा मला विश्वास वाटतो.

उदयनराजेंची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याचे विचारल्यावर काकडे यांनी उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे, असा सवाल केला. लोकसभा पोटनिवडणुकीत पक्षाने सर्व मदत केल्यानंतरही त्यांचा श्रीनिवास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीकडून पराभव झाला. श्रीनिवास पाटील तर गेली दहा वर्षे सक्रिय राजकारणापासून आणि साताऱ्यापासून दूर होते. तरीही राजेंचा पराभव झाला. हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. केवळ छबी असल्याने पक्षाला उपयोग होतो असे नाही. जनाधार जेवढा दाखवला जातो, तेवढा उदयरनराजेंच्या मागे खरेच आहे का, याचाही विचार व्हायला हवा, असाही टोला काकडे यांनी लगावला. 

काकडे यांच्या या टिकेनंतर भाजपमध्ये त्याचे काय पडसाद उमटणार, याची आता उत्सुकता राणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सत्काराच्या कार्य़क्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील काकडेंच्या बोलण्यावर अंकुश ठेवता येत नाही, असा टोमणा राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि संजय काकडे या दोघांनाही लगावला होता. त्यानंतर तीनच दिवसांत संजय काकडे यांच्या या विधानानंतर नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सातपैकी तीन जागा या भाजपला सहज मिळू शकतात. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे यांची नावे पक्की समजली जातात. संजय काकडे यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांची नावे भाजपमध्ये चर्चेत आहेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live