ईश्वराचा ध्वनी | डॉ. सलील कुलकर्णी |

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 सप्टेंबर 2019

आपल्या आवाजानं कोट्यवधी गानप्रेमींना आनंदाचा ठेवा देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर येत्या शुक्रवारी (ता. २८) वयाची नव्वद वर्षं पूर्ण करत आहेत. एक संगीतकार म्हणून या आनंदस्वराला स्वरांच्या कोंदणात बांधण्याचं भाग्य दोन संगीतकारांना मिळालं. लतादीदींबरोबर ताजं काम केलेले प्रतिभावान संगीतकार सांगत आहेत दीदींबरोबर काम करतानाच्या आठवणी...

आपल्या आवाजानं कोट्यवधी गानप्रेमींना आनंदाचा ठेवा देणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर येत्या शुक्रवारी (ता. २८) वयाची नव्वद वर्षं पूर्ण करत आहेत. एक संगीतकार म्हणून या आनंदस्वराला स्वरांच्या कोंदणात बांधण्याचं भाग्य दोन संगीतकारांना मिळालं. लतादीदींबरोबर ताजं काम केलेले प्रतिभावान संगीतकार सांगत आहेत दीदींबरोबर काम करतानाच्या आठवणी...

ज्याला संगीत कळतं त्याला लतादीदी समोर बसल्या, की फक्त त्या दिसत नाहीत. त्यांच्या मागं त्यांच्या हजारो गाण्यांचे पर्वत, त्याची शिखरं दिसायला लागतात. रोशन साहेब, अनिल विश्वास यांच्यापासून ए. आर. रेहमानपर्यंत आणि हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, डावजेकर अशी मराठीतली शिखरं एका बाजूला दिसू लागतात आणि दीपून जायला होतं. या सगळ्याच्या समोर बसलेल्या असतात एक प्रामाणिक गायिका- ज्या म्हणतात : ‘‘तुम्हाला हवं तसं येईपर्यंत तालीम करू या!’’ हजारो गाणी झाल्यानंतरसुद्धा त्या कागदावर स्वतः गाणं लिहून त्यावर श्वासाच्या खुणा, हरकती यांच्या नोंदी करतांना मी पाहिलं आणि मला त्यांच्या ‘भारतरत्न लता मंगेशकर’ असण्याचं कारण उमगलं.

भारतीय वंशाची माणसं जगभरात कुठंही असली, तरी काही गोष्टी बरोबर घेऊन जगतात... आई-वडिलांचा फोटो, ईश्वराची प्रतिमा आणि लता मंगेशकर यांचा आवाज! चोवीस तासांतला कोणताही क्षण असा असणं शक्य नाही, जेव्हा जगभरात कुठं तरी लतादीदींच्या स्वरानं वातावरण भरून आणि भारावून गेलेलं नाही... देवळात, घरात, नाट्यमंदिरात, अनेकांच्या गाडीत, संगीतप्रेमींच्या मेळाव्यात, धाब्यावर, ट्रकमध्ये, मांडवात, शाळेच्या प्रार्थनेत, एखाद्या आध्यात्मिक मेळाव्यात, उत्सवात, लग्नसमारंभात, पूजेसाठी, नृत्यासाठी... कुठंही असेल; पण तो स्वर सतत वाजतोय, गाजतोय आणि थोडीथोडकी नव्हे, तर सत्तरहून अधिक वर्षं!
पहाटे पहाटे कुठं तरी दूरवर ‘सुंदर ते ध्यान’ ऐकू येतं... काही क्षणांत ‘मोगरा फुलला’ कानावर पडतं आणि त्यांच्या स्वरातला ‘मोगरा’ शब्द ऐकताना जाणवतो तो शुभ्र पांढरा रंग- जो मला डोळ्यांना कधीच दिसला नाही. एखाद्या शाळेच्या प्रार्थनेत एखादी ओळ ऐकू येते ती ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ची आणि अचानक आपल्या गाडीत रेडिओवर, पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वीचं ‘रस्मे उल्फत को निभायें’ ऐकू येतं... अंगावर काटा येतो. तेवढ्यात गाडी एखाद्या मांडवाजवळ सरकते आणि त्या मांडवात ‘गणराज रंगी नाचतो’ चालू असतं. पलीकडच्या मांडवातून ‘ओम नमोजी आद्या’ कानावर पडतं. एखाद्या शाळेत समारंभाला जावं आणि मग तिथं एकदम अलीकडच्या ‘ओ पालन हारे’वर लहान मुलांचं नृत्य चालू असतं आणि विंगेत एक छोटी मुलगी दीदींनी गायलेलं पसायदान गायला थांबलेली असते. कोणाचा तरी फोन वाजतो आणि रिंग टोन असतो : ‘लग जा गले’... तुम्ही फक्त कान द्या... लतादीदींचा आवाज हवेतच आहे आता आपल्याकडे... कायमचा!

या ईश्वराच्या आवाजाची किती रूपं? लतादीदी जेव्हा ‘अवचिता परिमळू’ गातात, तेव्हा त्या माऊली होऊन भेटतात. ‘आनंदाचे डोही’ ऐकताना वाटतं, याच तुकोबा आहेत. ‘ने मजसी ने’ गाताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दातलं तेज जाणवतं आणि ‘निश्चयाचा महामेरू’ ऐकताना त्याच समर्थसुद्धा होतात. ‘सरणार कधी रण’ म्हणत बाजीप्रभू देशपांडेंच्या मनाची अवस्था दिसते आणि दुसऱ्या क्षणी त्या मीराबाई होऊन ‘माई माई कैसे जियु री’ म्हणतात....  
श्रावणात ‘घननीळ’ होऊन दीदींचा आवाज भेटतो आणि नदीला पूर आल्यावर ‘बेभान वारा’ होतो. ‘मावळत्या दिनकरा’ ऐकतान सूर्य बुडताना जाणवतो आणि ‘भय इथले संपत नाही’ म्हणत आपल्याला कातर करतो.   

लहानपणीपासून परमेश्वराची करतो, तशीच पूजा मी लतादीदींची केली. कोणताही अभिनिवेश नसणारं थेट आत्म्यातून आत्म्यापर्यंत जाणारं त्यांचं गाणं मला अगदी लहानपणापासून वेड लावतं. ईश्वराचं अस्तित्व आहे हे सिद्ध करणारा ईश्वराचा ध्वनी म्हणजे ‘लतादीदी.’ स्वप्नांत स्वप्न पडावं तसा एक सुवर्णयोग माझ्या आयुष्यात सन २०१३ मध्ये आला आणि लतादीदीनीं माझ्या दोन संगीतरचना गायल्या. माझ्यासारख्या छोट्या संगीतकाराला त्यांच्या आवाजाचा स्पर्श झाला आणि मी पावन झालो.  
‘सजण दारी उभा, काय आता करू  
घर कधी आवरू, मज कधी सावरू?
मी न केली सखी अजून वेणीफणी, मी न पुरते मला निरखले दर्पणी’
... सुरेश भटांची ही रचना गाता गाता मला जाणवलं, की अगदी अशीच अवस्था माझी झाली होती जेव्हा मी लतादीदींकडे तालमीसाठी गेलो होतो. आपला परमेश्वर समोर उभा आहे आणि आपण किती थिटे आहोत... आपली तयारी काय? आणि थेट ‘त्यांना’ चाल सांगायची? लहानपणापासून अनेक पुस्तकांतून वाचलेल्या आणि डोळ्यांसमोर उभं राहिलेल्या त्यांच्या रियाझाच्या आणि तालमीच्या खोलीत बसून तालीम करणं हा अनुभव, ‘अजि म्या ब्रह्म पाहिला‘ असाच. ज्याला संगीत कळतं त्याला लतादीदी समोर बसल्या, की फक्त त्या दिसत नाहीत. त्यांच्या मागं त्यांच्या हजारो गाण्यांचे पर्वत, त्याची शिखरं दिसायला लागतात. रोशन साहेब, अनिल विश्वास यांच्यापासून ए. आर. रेहमानपर्यंत आणि हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, डावजेकर अशी मराठीतली शिखरं एका बाजूला दिसू लागतात आणि दीपून जायला होतं. या सगळ्याच्या समोर बसलेल्या असतात एक प्रामाणिक गायिका- ज्या म्हणतात : ‘‘तुम्हाला हवं तसं येईपर्यंत तालीम करू या!’’ हजारो गाणी झाल्यानंतरसुद्धा त्या कागदावर स्वतः गाणं लिहून त्यावर श्वासाच्या खुणा, हरकती यांच्या नोंदी करतांना मी पाहिलं आणि मला त्यांच्या ‘भारतरत्न लता मंगेशकर’ असण्याचं कारण उमगलं. मास्टर दीनानाथांकडून मिळालेला स्वर, अमाप कष्ट आणि या सगळ्याइतकंच गाण्याशी असलेलं इमान.

‘आता विसाव्याचे क्षण’च्या वेळी त्यांनी माइक्रोफोन चेक करायला एक ओळ गायली आणि तिथं उपस्थित असलेल्या आम्हा सगळ्यांच्या अंगावर त्या स्वरानं काटा आला. प्रत्येक वेळेला ‘‘तुम्हाला हवं तसं गाऊन घ्या बरं का?’’, ‘‘मी आज दमले तर उद्या परत येते; पण तुमचं समाधान होईपर्यंत आपण रेकॉर्डिंग करू या’’ ही त्यांची गाण्याकडे बघण्याची नजरसुद्धा प्रत्येकाने शिकावी अशी .
संगीतातली तज्ज्ञ मंडळी, अभ्यासक यांची संगीताची शिबिरं जरूर ऐकावीत, पुस्तकं वाचवीत आणि... त्यांनी उत्तम गाण्यांबद्दल; गाण्यात श्वास कसा वापरावा, शब्दोच्चार, भाव, प्रत्येक गाण्यानुसार आवाज लावण्यात करायचे बदल याबद्दल जे जे सांगितलं त्या सगळ्या निकषांचा समावेश असलेली गायकी म्हणजे ‘लतादीदी’...त्यांची गाणी ऐकावीत!
‘संधिप्रकाशात’ आणि ‘आता विसाव्याचे क्षण’ ही दोन गाणी ‘क्षण अमृताचे’साठी त्यांनी ध्वनिमुद्रित केली... त्या जेव्हा फोनवर ‘‘आपलं रेकॉर्ड आवडतंय का लोकांना?’’ असं विचारतात तेव्हा ‘आपलं’ म्हणजे माझं आणि या ईश्वरी स्वरांचं एकत्र असं काहीतरी घडलं ही गणपतीबाप्पाची कृपा! दीदींना हृदयनाथजींविषयी आणि हृदयनाथजींना दीदींविषयी बोलताना ऐकणं हा एक अफाट अनुभव. भाऊ-बहीण, संगीतकार-गायिका आणि यापलीकडे दोन विद्वान माणसं.

आई होऊन ‘नीज माझ्या नंदलाला’ म्हणत त्यांचा आवाज आई होऊन कुशीत घेतो. ‘मालवून टाक दीप’ म्हणत प्रेयसी होऊन मिठीत घेतो. या ईश्वराची रूपं शोधण्यात आपलं जन्माचं सार्थक आहे. आपण अशा काळात या पृथ्वीतलावर आहोत जिथं लतादीदी राहतात, त्यांचा आवाज नांदतो...! पाहा, आताही कान देऊन ऐका- कुठं तरी ‘हे हिंदुशक्ती संभूत दीप्तीसम तेजा’ ऐकू येतंय... शहारा येतोय... कोणी तरी ‘अगर मुझसे मोहब्बत है, मुझे तुम अपने गम दे दो’ म्हणत अश्रू गाळतंय आणि कुठं तरी ‘मेरी आवाज ही पहचान है’ घुमतंय...  हा ईश्वराचा आवाज चराचरात आहे... राहील! दीदी... साष्टांग नमस्कार!!

Web Title: saptarang lata mangeshkar article write dr saleel kulkarni
 


संबंधित बातम्या

Saam TV Live