सोमनाथ भोंगळे यांच्या ‘थ्री-डी रांगोळी’ची भुरळ जगभर

सोमनाथ भोंगळे यांच्या ‘थ्री-डी रांगोळी’ची भुरळ जगभर

सासवड - विविध सण-उत्सव आणि सांस्कृतिक, घरगुती कार्यक्रमात आपण रांगोळी काढतो. पण, सासवड (ता. पुरंदर) येथील सोमनाथ भोंगळे यांनी आपल्या कमर्शिअल जी. डी. आर्टसच्या जोरावर व अभ्यासपूर्ण कल्पनाशक्तीने आगळ्या ‘रांगोळी’चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या ‘थ्री-डी रांगोळी’ची भुरळ राज्यासह जगभर पडू लागली आहे.

सोमनाथ भोंगळे (वय ४३) यांनी ‘कमवा व शिका’ पद्धतीने शिक्षण घेत पेंटिंग, एटीडीपासून जी. डी. आर्टस पूर्ण केले. मग बोर्ड रंगविणे, शाळांच्या भिंती कार्टून चित्रांनी बोलक्‍या करणे व रांगोळीत कौशल्य दाखवीत रोजीरोटीचा प्रश्न संपविला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिचित्र रंगावलीचे प्रदर्शन भिरविले. गेले १० ते ११ महिने सोमनाथ यांनी ‘थ्री-डी रांगोळी’द्वारे धमाल उडवून दिली आहे. अगदी एखादी व्यक्ती, वस्तू, चित्र ‘थ्री-डी’ रांगोळीतील रचनात्मक व छाया-प्रकाशाद्वारेचा इफेक्‍ट साधत त्रिमिती दर्शनाचा अभासच निर्माण करते.

भक्तिरंगात व लोकरंगात रंगणारे पुरंदर आज सोमनाथ यांच्या रंगावलीमध्ये रंगतेय. थ्री-डी रांगोळीतील नव्या कलेच्या गवसणीमुळे रोज कुठेना कुठे ते रंग भरायला जातातच. ठिपक्‍यांची मांडणी अन्‌ रंगांची दिलजमाई ते इतकी बेमालूम करतात, की रांगोळी नव्हे ते कॅमेऱ्याने काढलेले रंगीत छायाचित्रच वाटते. छोट्यापासून ते १५ हजार चौरस फुटांपर्यंत त्यांनी रांगोळ्या साकारल्या आहेत. 

बच्चन यांच्याकडून  ब्लॉगवर कौतुक
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील प्रसंगांवर काढलेल्या रांगोळ्यांचे फोटो थेट बच्चन यांच्यापर्यंत पोचले. त्यानंतर बच्चन यांनी हे फोटो ट्‌विटरच्या ब्लॉगवर ठेवून सोमनाथ भोंगळेचा उल्लेख करून कौतुक केले. भेटण्याचीही इच्छा दर्शविली होती. 

गोव्यात पुरस्कार
भारत सरकारच्या लाइफस्टाईल इन्शुरन्सच्या उद्‌घाटनानिमित्त कोल्हापूरच्या भारतीय ह्युमॅनिटी ॲकॅडमिक रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर यूथतर्फे पणजी (गोवा) येथे कला व सांस्कृतिक भवनात राष्ट्रीय पुरस्कार वितरण झाले. त्यात तेथील कला संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळनकर यांच्या हस्ते सासवडच्या सोमनाथ भोंगळे यांना ‘आयडियल थ्री-डी रंगोली आर्टिस्ट’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Somnath Bhongale artist 3D rangoli

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com