#SaathChal प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी वारीसाठी उपक्रम 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात सामील वारकऱ्यांना मोफत सेवा दिली जाणार आहे. यामध्ये दिंडीला प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. ज्येष्ठ वारकऱ्यांच्या नेत्र तपासणीनंतर मोफत चष्मे आणि मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया माउलींचा पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामी रविवारी (ता. ८), तसेच मंगळवारी (ता. १०) करणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी दिली.

आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात सामील वारकऱ्यांना मोफत सेवा दिली जाणार आहे. यामध्ये दिंडीला प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. ज्येष्ठ वारकऱ्यांच्या नेत्र तपासणीनंतर मोफत चष्मे आणि मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया माउलींचा पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामी रविवारी (ता. ८), तसेच मंगळवारी (ता. १०) करणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी दिली.

याबाबत ढगे यांनी सविस्तर माहिती दिली. माउलींच्या पालखी सोहळा ६ जुलैला आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, सोहळ्यात यंदाच्या वर्षी प्लॅस्टिकबंदीचे सावट आहे. तरीही वारीत थर्माकोलच्या पत्रावळीला बंदी असल्याने प्रदूषणमुक्तीसाठी देवस्थान यंदाच्या वर्षी प्रोस्ताहनपर प्रत्येक दिंडीला एक हजार कागदी पत्रावळी वितरित करणार आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून वारीसाठी प्लॅस्टिक कागद तंबूत झोपण्यासाठी तसेच पावसापासून बचाव करण्यासाठी वापरास बंदीची अट शिथिल केली आहे. वारीत सामील ज्येष्ठ वारकऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी, तसेच मोतीबिंदू आढळल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. याचबरोबर मोफत चष्मेवाटपही केले जाणार आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या मार्फत वारीच्या वाटेवर औषध वाटपासाठी यंदाच्या वर्षी दुचाकीवरून आरोग्यदूत फिरतील. हे आरोग्यदूत मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वाटचालीत आरोग्यसेवा देणार आहेत. वारीत अनेक वेळा जुने ट्रक वापरले जात असून, अनेक जण डिझेलऐवजी रॉकेलचा वापर करतात. या वेळी आरटीओ तपासणी केलेल्या वाहनांनाच वारीच्या वाटेवरचे वाहन पास दिले जातील. मंदिर आणि पालखी मार्गावर भाविकांना सोयी देण्याबरोबर सुरक्षितता पुरविण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा विकसित केली. पालखी सोहळ्यासाठी माउलींचा चांदीच्या रथाची किरकोळ दुरुस्ती आणि पॉलिशचे काम पूर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षी भाविकाने देणगीदाखल दिलेला नवीन रथ वापरण्यात येणार आहे. माउलींच्या पादुका आणि पूजेसाठीची चांदीच्या भांड्यांना उजाळा देण्याचे काम पूर्ण झाले. चांदीची अब्दागिरी, कर्णा, याचबरोबर सोहळ्यासाठी लागणारा किराणा मालही देवस्थानने जमा केला आहे. पालखी प्रस्थानसाठी दर्शनबारीचे काम पूर्ण झाले असून, भाविकांची संख्या वाढल्यास दर्शनबारी भक्ती सोपान पुलावरून नदीपलीकडे फिरविण्यात येणार आहे. मंडपाचे काम सुरू आहे. ऐनवेळी पावसामुळे इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास दर्शनबारी भक्ती सोपानपुलावर न नेता, शनी मंदिरमार्गे वाहनतळाच्या जागेतून नवीन पुलावर फिरविण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराच्या मागील बाजूस नव्याने दर्शनमंडप उभारला असून, त्या ठिकाणी प्रस्थान काळात आणि प्रस्थान झाल्यानंतर पालखी आजोळघरी आल्यावर भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. मंदिर आणि महाद्वारात सुमारे ९६  सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. याशिवाय देवस्थानचे स्वतःचे सुरक्षा गार्ड आणि संपर्कासाठी २४ वॉकीटॉकी सज्ज आहेत. प्रस्थानच्या दिवशी दुपारी एकनंतर प्रस्थानसाठी मानाच्या दिंड्या आत घेणार असल्याने देवूळवाड्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी मार्गावर सवलतीतील २५ हजार ज्ञानेश्वरी विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. 

आजपासून भाविकांना खिचडीवाटप
यंदा प्रथमच दर्शनाच्या रांगेतील भाविकांना आळंदीत देवस्थानच्या वतीने सोमवारपासून (ता. २) खिचडीवाटप केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोयही केली आहे. सोहळ्याचे दर्शन व्हावे आणि मंदिराच्या बाजूला गर्दी होऊ नये, यासाठी प्रदक्षिणा रस्त्यावर पालिका चौक, वडगाव चौक, चाकण चौक, इंद्रायणी घाट अशा चार ठिकाणी स्क्रीन उभारण्यात येणार आहे. याशिवाय वारीच्या वाटेवरही सोहळ्याचे सचित्र दर्शन स्क्रीनवर दाखविण्यात येणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

  •  माउली बाग व मंदिराबाहेर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय 
  •  २४ तास वीजपुरवठ्यासाठी जनरेटर
  •  प्रवेशद्वारात आणि पानदरवाजात दोन मेटल डिटेक्‍टर
  •  खांदेकरी, मानकरी, स्वयंसेवक, पासधारकांसाठी ओळखपत्रे
  •  महाद्वारातून पासधारकांना प्रवेश देण्यात येईल
  •  बुधवारपासून (ता. ४) भाविकांना प्रवेश बंद 
  •  देऊळवाड्याच्या मागील बाजूकडून नव्या दर्शनबारीतून प्रवेश
  •  पानदरवाजातून पूजाधारकांना प्रवेश राहील.

संबंधित बातम्या

Saam TV Live