क्रांतीज्योतींची विविध रुपे - शिक्षिकेसह कवयित्री आणि पत्रकारसुद्धा

क्रांतीज्योतींची विविध रुपे - शिक्षिकेसह कवयित्री आणि पत्रकारसुद्धा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या देशातील आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका आहेतच, याशिवाय त्या उत्कृष्ट पत्रकार, आधुनिक कवयित्रीही आहेत. त्यांची आज 189वी जयंती, त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेवर, कवितेवर थोडक्‍यात टाकलेला प्रकाश... 

सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या समाज परिवर्तनाच्या कामाला पावालोपावली साथ देत स्त्री शिक्षणाचा पाया घातला. महात्मा फुलेंच्या समाज सुधारणेच्या कार्याच्या काळातच मराठी पत्रकारिता जोर धरीत होती. पत्रकारितेचे मोल समजल्याने वृत्तपत्रांची संख्या वाढत होती, मात्र ही पत्रे महात्मा फुलेंच्या समग्र परितवर्तनाच्या कार्यापासून दूर होती.

आपण हाती घेतलेल्या समाज परिवर्तनाच्या कार्यासाठी पत्रकारिता हे मोठे साधन आहे. याची जाण निश्‍चितच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना होती. त्यामुळे फुले दांपत्याने समाज बदलाचे साधन म्हणून वृत्तपत्रातून लेखन केल्याचे आढळून येते. "सुबोध पत्रिका'चे संपादक मोरो विठ्ठल वाळवेकर, हे महात्मा फुलेंचे जीवलग स्नेही. वाळवेकर हे नेहमी महात्मा फुलेंकडे यायचे. त्या वेळी स्त्री-शिक्षण, सुधारणेवर नेहमी चर्चा होत असे. सावित्रीबाईंना स्त्रियांच्या उन्नतीसाठी तळमळ असे. त्यामुळे त्यांनी स्त्रियांविषयी एक स्वतंत्र मासिक काढण्याबाबत वाळवेकरांना सुचविले. त्यावरून वाळवेकरांनी "गृहिणी' या नावाने मासिक सुरू केले. या मासिकामध्ये स्त्री-शिक्षण व स्त्री प्रश्‍न, सुधारणांच्या अंगाने लेख येत असत. या मासिकामध्ये सावित्रीबाई स्वत: स्त्री प्रश्‍नांवर लिहित होत्या.

सावित्रीबाई दर महिन्याला ते मासिक आवडीने वाचत असत. लेख लिहिताना सावित्रीबाईंना स्वत:चे नाव प्रसिद्ध करणे मुळीच आवडत नसे. त्यामुळे अनेकदा त्या टोपण नावाने अथवा आपल्या एखाद्या मैत्रिणीच्या नावाने लेख प्रसिद्ध करीत असत. आपली किर्ती दुसऱ्याच्या तोंडून ऐकण्याचे त्यांना आवडत नसे. प्रसिद्धीचा कोणताही हव्यास त्यांना नव्हता. उलट महात्मा फुलेंनी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपला फोटो काढून दिला नाही. प्रसिद्धीपेक्षा समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि सामाजिक न्याय या तत्त्वावर आधारित आदर्श समाज निर्माण करणे, हे त्यांचे ध्येय होते. अत्यंत निगर्वी, शांत, प्रेमळ, संवेदनशील मन असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्याकाळात त्यांनी मासिकातून केलेल्या लेखनावरून मराठी पत्रकारितेतील पहिल्या महिला पत्रकार असा त्यांना उल्लेख करणे उचित ठरते.

पत्रकारितेबरोबरच सावित्रीबाई एक उत्कृष्ट कवयित्री होत्या. 1854 मध्ये "काव्यफुले' नावाचा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यामध्ये त्यांनी प्रबोधनात्मक, रचानात्मक काव्यरचनाही केल्या आहेत. यामध्ये त्या स्त्रिया, शुद्रांना शिक्षण घेण्याचे आवाहन करतात. धर्मव्यवस्था, अंधश्रद्धा, जातीयतेवर त्यांनी प्रहार केला. मानव आणि निसर्ग हे एकमेकांना पूरक असल्याच्या कविताही त्यांनी केल्या. यावरून त्या आद्य पर्यावरणवादी कवयित्री ठरतात. शिवाय केशवसुंताच्याही आधी सावित्रीबाईंनी कविता केल्याने त्या आधुनिक मराठीतील आद्य कवयित्री ठरतात. काव्यातून त्यांनी ग्रामीण चित्र मांडले. 

Web Title: Savitribai Phule was good poet and journalist also

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com