तेल लावलेला पैलवान पावसात भिजला, महायुतीला फटका?

सिद्धेश सावंत
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नवी मुंबई : हवामान विभागाला आपल्याकडे फार सीरिअसली घेण्याची पद्धत नाहीये. पण गेल्या काही अंदाजांमध्ये हवामान विभागाने शंभर पैकी शंभर गुण मिळवलेत. यंदाही पावसाचा अंदाज होता. खरंतर मौसम ऑक्टोबर हीटचा आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेने सगळ्यांच राजकीय पक्षांना घाम फोडलाय. प्रचारसभा दरवेळीप्रमाणे यंदाही झाल्या. पण २०१९च्या निवडणुकीतली साताऱ्यात झालेल्या सभेची इतिहासात नोंद घेतली जाईल. 

नवी मुंबई : हवामान विभागाला आपल्याकडे फार सीरिअसली घेण्याची पद्धत नाहीये. पण गेल्या काही अंदाजांमध्ये हवामान विभागाने शंभर पैकी शंभर गुण मिळवलेत. यंदाही पावसाचा अंदाज होता. खरंतर मौसम ऑक्टोबर हीटचा आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेने सगळ्यांच राजकीय पक्षांना घाम फोडलाय. प्रचारसभा दरवेळीप्रमाणे यंदाही झाल्या. पण २०१९च्या निवडणुकीतली साताऱ्यात झालेल्या सभेची इतिहासात नोंद घेतली जाईल. 

बुधवारीच हवामान खात्यानं पावासाचा इशारा दिलेला. विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात पाऊस पडेल, असा इशारा होता. विशेष सांगायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पावासाचा इशारा देण्यात आलेला नव्हता. अशात गुरुवारी उकाडा फार वाढला. शुक्रवारी सकाळपासूनच सगळीकडे मळभ दाटलं होतं. गेल्या ५ वर्षांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष कोणत्या मनस्थितीत होता, याचा अर्थ उलगडून कुणाला सांगायचा असेल, तर हे मळभ दाखवण्याची संधी विरोधकांकडे होती. अशातच मळभ असलेल्या वातावरणात शरद पवारांनी पंढरपूर आाणि अंबाजोगाईत सकाळी सभा घेतली. संध्याकाळी पवार साताऱ्यात दाखल झाले. हवेतली आर्द्रता आणखी वाढली होती. पावसाच्या इशाऱ्याला नेहमीप्रमाणे सीरीअसली न घेता राष्ट्रवादीची प्रचारसभा सुरु झाली. साताऱ्याचं जिल्हा परिषदेचं मैदान पवारांना ऐकायला सज्ज झालं होतं. अस्पष्ट उच्चारांमुळे पवार भाषण करताना अनेकदा काय बोलतात, हे कळतही नाही. असं असलं, तरीही जिल्हा परिषदेचं ग्राउंड खच्चाखच भरलं होतं. पवार बोलायला उभे राहिले. आणि पाऊसही पवारांना ऐकायला आला.

लोकांना वाटलं पवार आटोपतं घेतील, आणि निघून जातील. ऐकायला आलेल्यांनी आडोसा धरायला सुरुवात केली. पण बघता बघता आडोशाला गेलेल्यांना पवारांनी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आडोसा सोडायला लावला. भर पावसात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी आपलं झंझावती भाषण सुरुच ठेवलं.  पवार भर पावसात भाषण करत आहेत, हे पाहून लोक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखीनच उत्साहीत झाले. 

टाळ्या, शिट्ट्या, पवारांच्या नावाचा जयजयकार आणि राष्ट्रवादीचा जयघोष, असं सगळं पवारांच्या भाषणादरम्यान सुरुच होतं. भर पावसात ८० वर्षांचा म्हातारा, पायाला गंभीर जखम झालेली असतानाही, लोकांशी बोलत राहतो, ही थोरच गोष्ट होती. सगळ्यांनाच पेचात टाकणाऱ्या पवारांच्या राजकीय खेळीने, त्यांच्या या भर पावसात केलेल्या भाषणानेही पेचात टाकलं.

- आता काय होणार?

पवारांनी भर सभेत भाषण केल्यामुळे भाजपची सत्ता जाणार आहे का? पावसात भिजत लोकांना साद घालणाऱ्या पवारांमुळे आघाडीच्या जागांमध्ये वाढ होणार आहे? पवारांना बदलेल्या माध्यमांची नस सापडली आहे ? पवारांचा पॅटर्न बदललाय ? या सगळ्या प्रश्नांवर गल्लोगल्ली चर्चा रंगणारेत, या शंकाच नाही. पण नेमकं या सगळ्यातलं काय होणार?

- पावसात भाषण केल्यामुळे काय फरक पडणार?

भर पावसात भाषण केल्यामुळे शरद पवारांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. विशेष म्हणजे तरुण पिढी  पवारांच्या पावसातील भाषणाची दाद देतेय. राजकीय विचारसरणीच्या पलिकडे जावून हे कौतुक होतंय. याचा नाही म्हटलं तरी थोडाफार परिणाम मतांमध्ये कन्व्हर्ट होईल, यात शंकाच नाही. पण तो परिणाम नेमक्या कोणत्या भागातून येतो, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

राष्ट्रवादीबाबत पश्चिम महाराष्ट्रात बराच राग होता. सत्तेत असताना पश्चिम महाराष्ट्रावर राष्ट्रवादीने अन्याय केल्याची भावना होती. राग होता. चीड होती. मतदार संतापले होते. पण पवारांच्या पावसातील भाषणामुळे एक प्रकारची सिंपथी मिळवण्यात पवार यशस्वी झालेत. इतकंच नाही, तर राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देणाऱ्यांनीच पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला होता, असं बिंबवण्यातही पवार यशस्वी झालेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आघाडीच्या जागा काहीशा वाढतील, अशी शक्यताय. पण विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मतदार घाम फोडतील, अशीच शक्यता दिसतेय.  

- तरुणांना पवार आवडू लागलेत?

पवार पावसात भिजल्याचे फोटो सोशल मीडियात वणव्यासारखे पसरले. त्यांच्यावर लोकं लिहू लागली. त्यांची स्तुती करु लागली. याचा अर्थ तरुणांना आकर्षित करण्यात पवार यशस्वी झाले, असा घेता येवू शकतो. पश्चिम महाराष्ट्राला महापुरानं वेढा घातल्यानंतर लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हाही पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. ज्या वेगाने पावसात भिजल्याचे पवारांचे फोटो शेअर झाले, त्या वेगाने पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतरचे फोटो वायरल झाले नसतील. पण शरद पवारांव्यतिरिक्त कुणीही पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं नाही, पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा इतर कुठल्या नेत्यानं पवारांसारखा प्रयत्न  केला नाही, असं लोकंच बोलताना ऐकू येतात. पूरस्थितीला मोदी आले नाही आणि मतं मागायला मोदी आले, असा उलट टोला लोकांकडून हाणला जातोय. यातूनही हेच स्पष्ट होतंय, की पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आणि सोशल मीडियात  आपली दखल घ्यायला भाग पाडलंय. तिथे पवार जिंकलेत.

तरुणांना म्हातारा नेता आवडतो, असा उल्लेख एका जाणकारानं केला होता. जय प्रकाश नारायण असतील, अण्णा हजारे असतील, यांच्यासोबतच पवारांचं नेतृत्त्व तरुणांना आवडू लागलंय, असं म्हणायलाही आता वाव आहे. मात्र नेतृत्त्व आवडणं आणि नेतृत्त्व स्वीकारणं, यातला फरकही नेमकेपणाने समजून घ्यायला हवा. कारण राज ठाकरेंना ऐकायला लोकं येतात, पण मतं द्यायला येत नाहीत! त्याच लॉजिकवर आवडणं आणि स्वीकारणं डिफ्रनशिएट करता येवू शकतं.

- पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं?

9 हा राज ठाकरेंचा लकी नंबर. ९ तारखेपासून राज ठाकरे पुण्यातून सभेला सुरुवात करणार होते. पण ९ तारखेला झालेल्या मेघगर्जनेमुळे राजगर्जना होवू शकली नाही. राज ठाकरेंना पवारांसारखं पावसाचं टायमिंग साधता आलं असतं, अशीही चर्चाय. मात्र यात एक गोष्ट अशीही समजून घ्यावी लागेल, की राज ठाकरेंच्या सभेआधीच पुण्यात पावसाला सुरुवात झाली होती. मात्र साताऱ्यात शरद पवार सभेला बोलायला उभे राहिल्यानंतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे जरी राज ठाकरे पावसात भर सभेत बोलायला उभे राहिले असले, तरी तिथे त्यांना ऐकायला कुणी आलं असतं का, याचाही विचार व्हायला हवा. 

- पवारांनी नव्या माध्यमाची नस ओळखली?

जाणकारांच्या मते, याआधी पवारांनी निवडणुकांमध्ये किंवा इतरत्र कुठेही केलेल्या भाषणात पॉप्युलेटीव्ह विधान केली नव्हती. पवार राजकारणातले कुंबले किंवा मुरलीधरन होते, असं म्हटलं तरी चालेल. ते गुगली टाकून सगळ्यांची विकेट काढायचे. मात्र यंदाच्या निवडणुकीत पवारांच्या भाषणांमधला सूर काहीसा बदललाय. ‘लहान मुलांशी कुस्ती खेळत नाही’, ‘पैलवान कोण’,  इतकंच काय, ‘मोदी शहांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही,’ असंही विधान शरद पवारांनी केलेलंय. ‘ईडीला येडी करुन सोडली’, सारखी विधानंही आपल्याला पवारांच्या तोंडून ऐकायला मिळाली.  शरद पवारांच्या या बदललेल्या पॉलिटिकल टोननेही अनेकांना भूवया उंचावल्यात. 

पश्चिम महाराष्ट्र किंवा एकूण महाराष्ट्रात रयतेचा राजा ही शिवाजीही ओळख आपल्यालाही मिळावी, यासाठी प्रत्येक नेता प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो. ‘उदयनराजे भोसलेंना तिकीट देऊन चूक केली’, असं म्हणत कबुलीनामा देणारे शरद पवार राजा, प्रजा आणि रयतेतला राजा बनण्याच्यादृष्टीचं परसेप्शन तयार करण्यात यशस्वी झालेत. 

उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारण इतकं महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व आहे, की मोदी आणि शहांच्या प्रभावापुढे माध्यमांना आपली दखल घेण्यासाठी भाग पाडायला लावण्यातही त्यांना यश आलेलंय. उदाहरणच घ्यायचं झालं, तर नरेंद्र मोदींच्या सभा तासनतास लाईव्ह दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या भाऊगर्दीत शरद पवार भाव खावून गेले. अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यापासून ते अजित पवार सापडेपर्यंत मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये फक्त एकच बातमी होती.. ती म्हणजे पवार आणि पवारच!

जळी, स्थळी काष्टी पाषाणी पवारच पवार होते. हा उल्लेख यासाठी महत्त्वाचा कारण ज्या दिवशी अजित पवारांनी राजीनामा दिला, त्यानंतर एकीकडे शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. तर दुसरीकडे यूएनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु होतं. मोदींचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कव्हरेजचा विचार केला तर मोदींचं यूएनमधलं भाषण ही मोठीच गोष्ट होती. मात्र पवाराच्या राजकीय खेळीमुळे मोदींचं भाषण मराठी वृत्तमाध्यमांमध्ये तरी दुर्लक्षिलं गेलं. 

शुक्रवार, १८ ऑक्टोबरला बीकेसीमध्ये नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचीही सभा झाली. या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे फोटो, व्हिडीओ समोर येत आहे. लोकसभेवेळी राहुल गांधींच्या सभेला झालेल्या सभेपेक्षाही कमी लोकं महायुतीच्या महाप्रचारसभेला आले. ३७०, आरे, राज्यातील महापूर हे विषय विरोधकांनी उचललेत. मात्र यामध्ये पीएमसी बँक खातेधारकांचा विषय जास्त भाजपला त्रास देवून जाईल, असं जाणकार सांगतात. अशा सगळ्यात पवारांचं पावसात भिजणं भाजपचे डोळे पाणावेल, असा सूर जोर धरतोय. 

- भाजपची सत्ता जाणार की फक्त जागा कमी होणार?

८० वर्षांचा म्हातारा पावसात भाषण करतो, ही महाराष्ट्राच्या राजकारणतली मोठी गोष्ट आहेच. कॅन्सरशी दोन हात केलेल्या माणसांने कशाचीही पर्वा न करता, उभा महाराष्ट्र पालथा घालणं, हे अन्य कुठल्या नेत्याला जमल्याचं ऐकिवात नाही. अशात निवडणुकीच्या काळात केलेली फडणवीसांची जनाशिर्वाद, आदित्यची जनादेश किंवा मग राज ठाकरेंचा दोन किंवा फार फार तर चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा, हे पवारांपुढे दुय्यमच ठरतील. ही लढाईदेखील पवार जिंकलेत. 

शरद पवारांच्या डाव्या पायाला जबर जखम झालेली आहे. त्यांच्या डाव्या पायाचं बोटच तुडलेलंय. त्याची सर्जरी झाल्यानंतर या वयात विश्रांती करायची सोडून पवार खऱ्या अर्थानं लढत आहेत. पवारांवर टीका करण्यापलिकडे मोदी-शहा-ठाकरेंकडे मुद्दे दिसत नाही आहेत. अशात पवारांनी आर्थिक मानसिकदृष्ट्या गलितगात्र झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पक्षांना किमान जिवंत ठेवलंय. असं सगळं असलं, तरी शरद पवार भाजपची सत्ता उलथवून लावू शकतील, असं कुठेच दिसत नाही. राष्ट्रवादी-काँग्रेस ४०-४२चा आकडा पुन्हा गाठू शकलं, तरीदेखील तो मोठा विजयच असेल, असं तज्ज्ञांचं म्हणणंय. 

९९ साली पवारांनी नवी पिढी राजकारणा दिली, घडवली असं शरद पवारांनी सामटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. नवी पिढी घडवण्यात यश आल्याचा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केलाय. पार्थच्या सपशेल अपयशानंतर राहित पवारांच्या राजकीय वाटचालीकडे आता सगळ्यांचे डोळे लागलेत. अशात पवार नवी पिढी पुन्हा तयार करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठीचा अनुभव कित्येक पावसाळे पाहिलेल्या पवारांकडे दांडगाच आहे. सध्याची राष्ट्रवादीची पिढी काही भाजपची सत्ता उलथवून टाकू शकत नाही, हे पवारांनाही ठाऊक आहेच. पण  पवारांची येणारी पिढी कितपत भाजपला आव्हान देऊ शकते, हे येणाऱ्या पावसाळ्यांवरुन कळेल. मात्र तोपर्यंत तरी शरद पवारांच्या पावसात भिजत केलेल्या भाषणाची प्रेरणा राष्ट्रवादीला जिवंत ठेवण्यासाठी पुरते का, हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title : Sharad Pawar Speed In Rain Blogg By Siddesh Sawant


संबंधित बातम्या

Saam TV Live