अजित पवार घेणार राजकीय संन्यास?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुणे : मुला, राजकारणापेक्षा शेती कर...सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे...काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांची वक्तव्ये बरेच काही सांगणारी आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

पुणे : मुला, राजकारणापेक्षा शेती कर...सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे...काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांची वक्तव्ये बरेच काही सांगणारी आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 71 जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार होते. मात्र, तशी आवश्यकता नसल्याचे ईडीने कळविल्याने पवार पुण्याला परतले. तेवढ्यात अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी याबाबतचा निर्णय अचानक घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज मुंबईत शरद पवारांसोबत राष्ट्रवादीचे सर्व नेते असताना अजित पवार नव्हते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले. अखेर त्यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी  राजीनामा मिळाल्याचे आणि कारण माहीत नसल्याचे म्हटले होते.

 

 

अखेर आज (शुक्रवार) रात्री शरद पवार यांनी पुण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत राजीनाम्याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले, की माझे नाव त्याठिकाणी आल्याने त्यांनी राजीनामा दिला असेल. राजीनाम्याचे कारण मलाही जाणून घ्यायचे आहे. आमचे कुटुंब एक असून, अजूनही माझी निर्णय अंतिम आहे. अजून माझी त्यांच्याशी भेट झालेली नाही. त्यांनी मुलांनाही राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला आहे. 

मुलाला अजित पवार तशा आशयाचे म्हणाल्याचे पवारांनी सांगितले. आजच्या राजकारणाची पातळी फारच घसरली आहे. तुही राजकारणातून बाहेर पड आणि शेती कर, असा सल्ला अजित पवारांनी मुलाला दिला आहे. खुद्द शरद पवारांनी तसे पत्रकार परिषदेत सांगितले.

अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार राजकारणात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मावळ मतदारसंघातून दणदणीत पराभव झाला होता. त्यामुळे, अजित पवार यांनी हा सल्ला पार्थ यांनाच दिल्याचे मानले जात आहे. अजित यांना पार्थ आणि जय असे दोन मुलगे आहेत, त्यापैकी पार्थ सध्या राजकारणात आहेत.

या सगळ्यावरून अजित पवार भविष्यात काय निर्णय घेणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षातून गेल्याने विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून ही खेळी केली जात आहे का? बँक गैरव्यवहाराशी संबंध नसताना नाव आल्याने पवार व्यथित झाले आहेत का? अजित पवार राजकारणातून संन्यास घेतील का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live