अबब! अन् तीनं दिला चक्क 21व्या बाळाला जन्म...

अबब! अन् तीनं दिला चक्क 21व्या बाळाला जन्म...

माजलगाव (जि. बीड) - शहराच्या बाजूलाच पालावर राहून संसाराचा गाडा हाकणाऱ्या लंकाबाईची एकविसाव्यांदा प्रसूती झाली. नववा महिना सुरू असताना ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात प्रवास करताना लंकाबाई ट्रॅक्‍टरमध्येच बाळंत झाल्या; मात्र दोन दिवसांच्या प्रवासात धक्के बसल्याने अर्भक मृत झालेले होते. विशेष म्हणजे प्रसूतीनंतर तिसऱ्याच दिवशी लंकाबाईने फडात ऊसतोडणीचे काम सुरू केले.

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर मालोजी देवराव खरात सहा महिने भंगार वेचून, तर सहा महिने ऊसतोड करीत संसाराचा गाडा हाकत आहेत. त्यांची चाळीस वर्षांची पत्नी लंकाबाई यांची यापूर्वी वीस वेळा प्रसूती झाल्या असून, त्यातील नऊ अपत्ये प्रसूतीनंतर दगावली आहेत. विशेष म्हणजे यातील एकही प्रसूती सरकारी रुग्णालयात झाली नाही. सद्यःस्थितीत नऊ मुली, दोन मुले असताना लंकाबाई 21 व्यांदा गर्भवती राहिल्या.

दोन महिन्यांपूर्वी ही बाब माध्यमातून समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने दाखल घेत त्यांची तपासणी केली. अनेक प्रसूती झाल्यामुळे गर्भपिशवी नाजूक झाल्यामुळे रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला होता; परंतु काम केल्याशिवाय चूल पेटत नसल्याने लंकाबाईंनी त्यास नकार दिला. नववा महिना सुरू असताना दहा दिवसांपूर्वी त्या ट्रॅक्‍टरमधून कर्नाटक राज्यातील शंकेश्‍वर कारखान्याला ऊसतोडणीसाठी जात होत्या.

प्रवासातच त्यांना कळा सुरू होऊन ट्रॅक्‍टरमध्येच प्रसूती झाली. दोन दिवसांच्या ट्रॅक्‍टरच्या प्रवासात धक्के बसल्याने अर्भकाचा गर्भातच मृत्यू झालेला होता. लंकाबाईला मृत बाळाचाच चेहरा पाहावा लागला. पोटाची आग शमविण्यासाठी लंकाबाईने रस्त्याच्या कडेलाच अर्भकाचे अंत्यसंस्कार करून तिसऱ्या दिवशीच हातात कोयता घेतला. ही माहिती लंकाबाईने सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांना दूरध्वनीवरून दिली. 

Web Title: Lankabai gives birth to 21st child

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com