शिशिर शिंदे पुन्हा घेणार शिवसेनेचा झेंडा हाती ? 

शिशिर शिंदे पुन्हा घेणार शिवसेनेचा झेंडा हाती ? 

मुंबई : वानखेडे स्टेडियमच्या धावपट्टीवर तेल पसरवून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होऊ देणार नाही, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात आणणारे शिशिर शिंदे पुन्हा एकदा शिवसेनेत परतणार आहेत.

राज ठाकरे यांच्या मैत्रीला जागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेल्या शिंदे यांनी भांडुप विधानसभेत विजय मिळवला होता. राज ठाकरे यांच्याशी संबंध दुरावल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला "जय महाराष्ट्र' केले होते.

आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजते. काही दिवसांतच स्वगृही शिवसेनेत परत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शिशिर शिंदे हे ठाकरे परिवाराच्या निकटचे मानले जात. 1991 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानशी क्रिकेट सामने होऊ देणार नाही, असा नारा दिला.

तेव्हा शिवसैनिकांनी हा निर्णय प्रत्यक्षात यावा यासाठी प्रचंड मेहेनत घेतली होती; मात्र कायदा हातात घेऊन थेट वानखेडे स्टेडियमवर पोहोचून खेळपट्टी खराब करण्याची मर्दुमकी गाजवणारे शिंदे त्या काळी हिरो ठरले होते.

 तेलाच्या किमती वाढल्या तेव्हा तेलसाठ्यांवर धाडी टाकून त्या जनतेला स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची कामगिरीही शिंदे यांनी बजावली होती. ठाकरे बंधूंपैकी राज यांच्याशी जवळीक असल्याने ते मनसेच्या स्थापनेनंतर मनसैनिक झाले.

विद्यार्थी सेनेपासून ते राज यांच्यासमवेत वावरत असत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राज यांना रामराम केला होता; मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा सेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. 

शिंदे यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचे काम आहे. या दोघांच्या पुढाकारानेच शिशिर पुन्हा सेनेत परतणार असल्याचे समजते. येत्या काही दिवसांतच यासंबंधीची घोषणा होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com