महाराष्ट्राच्या माथी गाढवाचं मुंडकं आणि रेड्याचं धड: उद्धव

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019


भाजपच्या धक्कातंत्रामुळं संतापलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. 'मुंडके गाढवाचे आणि धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून फडणवीस व अजित पवार एकमेकांना लाडू भरवतातहेत. पण हे लाडू त्यांना पचणार नाहीत. त्यांचे बंड फसले आहे,' असा घणाघात उद्धव यांनी केला आहे.

मुंबई: भाजपच्या धक्कातंत्रामुळं संतापलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. 'मुंडके गाढवाचे आणि धड रेड्याचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून फडणवीस व अजित पवार एकमेकांना लाडू भरवतातहेत. पण हे लाडू त्यांना पचणार नाहीत. त्यांचे बंड फसले आहे,' असा घणाघात उद्धव यांनी केला आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं अजित पवारांना फोडून नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी मिळाली. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपपासून दूर झालेल्या शिवसेनेसाठी हा धक्का होता. उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी यावरून भाजपवर निशाणा साधला होता. आज पुन्हा एकदा भाजप, फडणवीस व अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

 

 

 

 

>> अजित पवार हे राष्ट्रवादीचे २५-३० आमदार फोडून आपल्याकडं येतील अशा भ्रमात भाजप होता. पण हा भ्रमाचा भोपळा फुटला आहे.

>> अजित पवारांनी भाजपच्या नादाला लागून राष्ट्रवादीच्या आमदारांना फसवलं. भाजपनं अजित पवारांना फसवलं आणि सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला फसवलं. या फसवणुकीसाठी राजभवनाचा गैरवापर झाला. हे पाप आहे. पाप-पुण्यापेक्षा ज्यांना सत्ता महत्त्वाची वाटते त्यांना शेवटची घरघर लागली आहे. जनतेनं थोडी वाट पाहावी.

>> सध्याच्या राजकारणामुळं भाजपचा मुखवटा गळून पडला आहे. मात्र, भाजपच्या चेहऱ्यावर इतके मुखवटे आहेत की एक गळाला तरी दुसरा तिथं असतोच. त्यामुळं मुखवटे गळत राहिले तरी खरा चेहरा समोर येत नाही. महाराष्ट्राची जनता हे सर्व मुखवटे ओरबाडून काढील.

>> अजित पवारांच्या रूपानं भाजपनं एक टोणगा त्यांच्या गोठ्यात आणून बांधला आहे व त्याचे दूध काढण्यासाठी 'ऑपरेशन कमळ' ही योजना आखली आहे.

>> अजित पवारांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवू असे सांगणारे भगतगण शपथविधीनंतर फडणवीस, अजित पवार आगे बढोच्या घोषणा देत होते. पण अजित पवार त्या जल्लोषात कुठंच दिसत नव्हते. कारण, महाराष्ट्राची जनता त्यांच्या 'मुर्दाबाद'च्या घोषणा देत आहे. २५ वर्षांच्या मैत्रीला न जागणारे भाजपवाले अजित पवारांचाही कडेलोट करतील.

>> सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची भाजपची तयारी आहे. पण काहीही झालं तरी त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. भाजपला आता बहुमत मिळणं म्हणजे टोणग्यानं दूध देण्यासारखं आहे.

>> भाजपचे लोक एरवी सत्ता हे साध्य नाही अशी प्रवचने झोडतात. नैतिकतेचा आव आणतात. बहुमत असल्यानं राज्यपालांनी शपथ दिली असं भाजपवाले म्हणत असतील तर मग 'ऑपरेशन कमळ'ची ही भामटेगिरी कशासाठी?

Web Title shiv sena chief uddhav thackeray lashes devendra fadnavis and bjp in saamana editorial


संबंधित बातम्या

Saam TV Live