ठाकरे ब्रँडवरुन शिवसेनेची मनसेला साद, वाचा काय घडलंय?

साम टीव्ही
रविवार, 13 सप्टेंबर 2020
  • ठाकरे ब्रँडवरुन शिवसेनेची मनसेला साद
  • 'आता आमची आठवण आली का?'; मनसेचं प्रत्युत्तर
  • मनसे शिवसेनेला टाळी देणारच नाही ?

कंगनाप्रकरणी शिवसेनेनं थेट राज ठाकरेंना साद घातलीय. ठाकरे ब्रँडवरुन राज ठाकरेंना शिवसेनेनं साद घातली. दुसरीकडे मनसे मात्र टाळी द्यायच्या मनस्थितीत नाही.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेत निर्माण झालेला वाद सुरुच आहे. याच वादात शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातलीय. विशेष म्हणजे ठाकरे ब्रँडवरुन मनसेला साद घालण्यात आलीय. 

'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल’ अशा शब्दात मनसेला शिवसेनेकडून साद घालण्यात आलीय. 

दुसरीकडे मनसे मात्र शिवसेनेला टाळी द्यायच्या मनस्थितीत नाही. संकटाच्या काळात आमची आठवण कशी झाली, असा सवास मनसेकडून उपस्थित केला गेलाय.

खरं तर मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना मनसे अनेकदा आमनेसामने आल्यात. दोन भावांच्या दोन सेनांमध्ये मुंबई मनपा, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय. यापूर्वी दोन्ही बाजूंनी एकमेकांना टाळी देण्यासाठी प्रयत्न झालेत. पण ते फलद्रुप होताना दिसले नाहीत. आता शिवसेनेनं पुन्हा मनसेला साद घातलीय. मात्र शिवसेनेला टाळी द्यायच्या मनस्थितीत मनसे नाही


संबंधित बातम्या

Saam TV Live