सामनातून शिवसेनेचे केंद्र सरकारला फटकारे...

सामनातून शिवसेनेचे केंद्र सरकारला फटकारे...

रॅपिड टेस्टिंग किट्सवरुन शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. चिनी वटवाघळांना लटकायचे कशाला असं म्हणत यावेळी केंद्र सरकारला सवाल करण्यात आलाय. मोदी सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्सची ऑर्डर चीनला दिली, त्या किट्सची पहिली खेप बिनकामाची निघाली , त्यामुळे चिनी माल भंगारात गेल्याचा उल्लेखही शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलाय. तसंच सध्याच्या बोगस किट्सऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले किट्स वापरा असा सल्लाही यातून देण्यात आलाय.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोनाच्या संकटाचा "सामना' करताना केंद्र सरकारकडून कशी मदत मिळेल याची काळजी घेत असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या मुखपत्रात मात्र दिल्लीकरांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत असे दिसते. 

पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीय मोदी सरकारवर घसरताना म्हटले आहे, मोदी सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्‌सची ऑर्डर चीनला दिली, त्या किट्‌सची पहिली खेप बिनकामाची निघाली.

शेवटी चिनी माल भंगारात गेल्यावर केंद्राला राज्यांना सूचना द्याव्या लागल्या की, "झाले ते झाले. सध्याच्या बोगस कीट्‌सऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले कीट्‌स वापरा! म्हणजे " मेक इन आणि मेड इन इंडिया' चा स्वदेशी माल असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांना लटकायचे कशाला ? असा सवाल शिवसेनेने "रॅपिड टेस्टिंग कीट' वरून सरकारला विचारला आहे. 

चीन कधी काय करेल याचा भरवसा नाही व इतके असूनही भारतासारखे राष्ट्र चीनकडून "कोव्हिड 2 ' या विषाणूच्या रॅपिड टेस्ट कीट मोठया प्रमाणात घेत आहे व एकप्रकारे चीनच्या अर्थव्यवस्थेस मजबुती देणारे काम करीत आहे. एक वेळ तेही चालले असते, पण चिनी मालाची अवस्था ही "चले तो चांद तक, नहीं तो रात तक" अशीच असते. त्यामुळेच चीनकडून खरेदी केलेले लाखो रॅपिड टेस्ट कीट भंगारात टाकून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. 

शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्राला केंद्राकडून , रॅपिड टेस्टचा चिनी प्रसाद मिळाला आहे. धारावीसारख्या "कोरोना हॉट स्पॉट भागात रॅपिड टेस्टचे काम सुरू झाले, पण मुंबई महापालिका प्रशासनाने या रॅपिड टेस्ट तत्काळ थांबवायला सांगितल्या. कारण चिनी माल नेहमीप्रमाणे भंगार निघाला व कोरोनाचा बाजार करून चीनने भारताच्या गळयात टाकावू माल मारला. 

फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून रॅपिड टेस्ट कीटबाबत तक्रारी येऊ लागल्या. हा सर्व गोंधळ कोरोनाबाबतची चिंता वाढवणारा आहे. या लढाईत आपण कसे गंभीर नाहीत व इतके होऊनही निर्णयात कशी एकवाक्‍यता नाही हे दाखवणारा हा गोंधळ आहे. ज्या चीनवर भरवसा ठेवता येत नाही व ज्या चीनने जगाला महामारीच्या संकटात ढकलले त्याच्याशी त्याच "व्हायरसशी लढण्यासाठी हातमिळवणी करावी हे धक्कादायक आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com