BLOG - शिवसेनेचा 'काटेरी गुलाब'

अशोक सुरवसे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

भारतीय राजकारण जातीपातीच्‍या पलिकडं कधी जाणारच नाही, असा प्रश्‍न वारंवार विचारला जातो. पण ही जबाबदारी एकट्या मतदारांवरच येते का ? राजकारण्‍यांना यातनं कायमस्‍वरुपी सूट दिली गेलीय का ? असा प्रश्‍न आता उपस्थित झालाय. याचं कारण म्‍हणजे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्‍त विधान! गुलाबराव पाटलांनी राज्‍य मंत्रिमंडळात संधी मिळेल की नाही, या प्रश्‍नावर उत्‍तर देताना गुलाबरावांची जीभ घसरली. मुख्‍यमंत्री ब्राह्मण आहेत म्‍हणून ते पंचांग पाहूनच विस्‍ताराचा मुहूर्त काढतील आणि राहू, केतू कोण, हेही पाहतील, असं विधान केलं.

भारतीय राजकारण जातीपातीच्‍या पलिकडं कधी जाणारच नाही, असा प्रश्‍न वारंवार विचारला जातो. पण ही जबाबदारी एकट्या मतदारांवरच येते का ? राजकारण्‍यांना यातनं कायमस्‍वरुपी सूट दिली गेलीय का ? असा प्रश्‍न आता उपस्थित झालाय. याचं कारण म्‍हणजे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्‍त विधान! गुलाबराव पाटलांनी राज्‍य मंत्रिमंडळात संधी मिळेल की नाही, या प्रश्‍नावर उत्‍तर देताना गुलाबरावांची जीभ घसरली. मुख्‍यमंत्री ब्राह्मण आहेत म्‍हणून ते पंचांग पाहूनच विस्‍ताराचा मुहूर्त काढतील आणि राहू, केतू कोण, हेही पाहतील, असं विधान केलं. जातीपातीच्‍या पलिकडचा विचार करण्‍याचा पायंडा पाडलेल्‍या बाळासाहेब ठाकरेंच्‍या शिवसेनेतल्‍या नेत्‍यानं असं वक्‍तव्‍य करावं आणि सेना नेतृत्‍वानं चकार शब्‍दही काढू नये, याचं खरंच आश्‍चर्य वाटतंय. राजकारण म्‍हटलं की मतभेद आलेच. पण हे मतभेद व्‍यक्‍त करताना थेट एखाद्याला जातीवरुनच टार्गेट केलं जावं, हे पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी धक्‍कादायकच आहे. बाळासाहेबांनी शिवसेना उभी करताना कोण कोणत्‍या जातीचा, त्‍याच्‍या मागं त्‍याची 'माणसं' किती आहेत, हे कधीच पाहिलं नाही. उलट केवळ आणि केवळ त्‍या माणसाची पात्रता, त्‍याची लायकी, त्‍याचा प्रामाणिकपणा अशा राजकारणात न चालणा-या निकषांना प्राधान्‍य दिलं आणि त्‍यांना राजकारणाच्‍या मुख्‍य प्रवाहात 'वाहते' केलं.

बाळासाहेबांच्‍या याच धाडसाचं केवळ राज्‍याच्‍याच नाही, तर देशाच्‍या राजकारणातही मोठं कौतुक केलं गेलं आणि आजही होतंय. पण बाळासाहेबांच्‍या याच मंत्राला, शिकवणीला हरताळ फासण्‍याचं काम गुलाबरावांसारखे 'काटेरी गुलाब' करत आहेत. असे गुलाब समाज भानाला, सामाजिक ऐक्‍याला रक्‍तबंबाळ करण्‍याआधीच त्‍यांना बाजूला करण्‍याचं काम शिवसेनेच्‍या नेतृत्‍वानं करावं, एवढीच महाराष्‍ट्राची माफक अपेक्षा आहे. प्रत्‍येक वेळी सहकारी पक्षाच्‍या धोरणांवर टीका करण्‍याची संधी शोधत बसण्‍यापेक्षा आपल्‍याच पक्षात, पक्षाच्‍या मूलभूत ढाच्‍यालाच धक्‍के देणा-या अशा 'गुलांबा'कडं पाहण्‍याचं धारिष्‍ट्य दाखवलं पाहिजे.

आपलं स्‍वतःचं कर्तृत्‍व झाकण्‍यासाठी इतरांच्‍या जातीवर भाष्‍य करणं कुठल्‍याही परिस्थितीत स्‍वीकार्य नाही. महाराष्‍ट्र अशा गोष्‍टींना कधीच थारा देत नाही, हे महाराष्‍ट्रानं वेळोवेळी दाखवून दिलेलं असतानाही, गुलाबराव पाटील असं धाडस कोणाच्‍या जोरावर करत असावेत ? शिवसेनेचं नेतृत्‍व या गुलाबावर येऊ लागलेले काटे का खुडून काढत नाही, असा प्रश्‍न माझ्यासारख्‍या अनेकांना पडलेला आहे.

शिवसेनेनं यावर वेळीच ब्रेक लावला नाही, तर शिवसेनेची सर्वसमावेशक अशी जी प्रतिमा बाळासाहेबांनी कळत-नकळतपणे उभी केलीय आणि तोच शिवसेनेचा यूएसपी ठरलाय, त्‍याला सुरुंग लागेल, हे वेगळं सांगायला नको. राजकारणात एखाद्या पदावर पोहोचलेला माणूस हा त्‍याच्‍या जातीमुळं नाही, तर त्‍याच्‍या कर्तृत्‍वामुळं पोहोचलेला असतो. गुलाबराव पाटीलही त्‍याला अपवाद नसावेत. जातीपेक्षा कर्तृत्‍व श्रेष्‍ठ असतं, आहे असं आपण, आपले बापजादे नेहमीच सांगत आलेत. पण त्‍याच बापजाद्यांना खोटं ठरवण्‍याचा खटाटोप गुलाबराव पाटलांसारखे काटे करु लागलेत. या काट्यांना जितक्‍या लवकर खुडून काढता येईल, तितक्‍या लवकर तसे प्रयत्‍न केले जावेत, हीच अपेक्षा. असे काटे फक्‍त शिवसेनेतच आहेत, असंही नाही. अशा काटेरी निवडुंगाचं पीक इतर राजकीय पक्षांमध्‍ये फोफवायला फारसा वेळ लागणार नाही. त्‍यामुळं शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी अशा काटेरी गुलाबांना कात्री लावण्‍याची गरज आहे.

WebTitle : marathi news shivsena gulabrao patil political blig by ashok surwase 


संबंधित बातम्या

Saam TV Live