तानाजी सावंतांनी झेडपी निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करुन व्यक्त केला राग...

तानाजी सावंतांनी झेडपी निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी करुन व्यक्त केला राग...

उस्मानाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षादेश धुडकावत औरंगाबाद जिल्हा परिषदेत बंड केल्यानंतर, त्याची पुनरावृत्ती उस्मानाबादेत देखील झाली. माजीमंत्री तानाजी सावंत यांनी थेट भाजपशी हातमिळवणी करत जिल्हा परिषदेच्या सत्तेत निर्णायक भूमिका वठवली. 

पुतणे धनंजय सांवत यांना उपाध्यक्ष करण्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांची रसद पुरवत सावंत यांनी मंत्रीमंडळातून आपल्याला डावल्याचा राग व्यक्त केल्याचे दिसते. सावंत यांच्या मदतीनेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व राखता आले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेला मात्र बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यमंत्रीमंडळ विस्तारात स्थान आणि मानाचे पान न मिळाल्या कारणावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य चांगलेच रंगले आहे. अगदी राजीनाम्याच्या अफवा पसरवण्यापासून थेट आघाडीलाच सुरूंग लावण्याचे काम विशेषतः मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये झाले. जिल्हा परिषद निवडणूक ही अशा नाराजांसाठी चालून आलेली आयती संधीच होती असे म्हणावे लागेल. औरंगाबाद जिल्हा परिषदेत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यास विरोध दर्शवत शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनाच रसद पुरवली. अगदी भाजपचे सदस्य गळाला लावत आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्याचा पक्का बंदोबस्त सत्तारांनी केला होता. 

पण नियतीला हे मान्य न झाल्यामुळे समान मतांमुळे ईश्‍वर चिठ्ठीत आघाडीला अध्यक्षपद मिळाले. परंतु, सत्तारांच्या बंडखोरीचा फटका उपाध्यक्षपदाच्या निवडीत अखेर शिवसेनेला बसलाच होता. हे प्रकरण अजून पुर्णपणे मिटलेले नसतांनाच याचीच पुनरावृत्ती शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याकडून उस्मानाबादेत झाली. मंत्रीमंडळातून डावलल्यानंतर सांवत यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. 

या चर्चेतून समाधान न झालेले सावंत 'पुन्हा मातोश्रीची पायरी चढणार नाही' अशी शपथ घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत ते आपला करिश्‍मा दाखवणार हे स्पष्ट होते, प्रत्यक्षात घडलेही तसेच.

मोटेंनी आघाडी धर्म पाळला..

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे आघाडीधर्म पाळणार की? नातेसंबंध सांभाळत राणाजगजितसिंह पाटलांना मदत करतात? याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागले होते.  तानाजी सावंत यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर मोटे यांचा कल देखील राणांकडे झुकल्याची चर्चा होती. पण मध्यंतरी अजित पवारांनी मोटे यांना फोन करून आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते. आज मोटेंनी तो पाळल्याचे देखील स्पष्ट झाले.

मोटे आघाडीच्या बाजूने गेल्यामुळेच सावंत यांनी राणाजगजितसिंह यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. बदल्यात पुतण्याला उपाध्यक्षही केले. शिवसेनेच्या ८ पैकी सात सदस्यांनी भाजपला मदत केली, तर एक सदस्य तटस्थ राहिला. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फुट पडल्याने पक्षासाठी हा मोठा धक्का समजला जातो.

Web Title -  shivsena leader Tanaji sawant takes side of bjp in zp election of usmanabad 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com