'शिवसेना स्वबळावर 155 आमदार निवडून आणणार'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ऐनवेळी शिवसेना-भाजप युती तुटली होती. तेव्हा शिवसेनेला वेळ मिळाला नव्हता. तरीही 63 आमदार निवडून आले; परंतु या वेळी आताच स्वबळाचा नारा दिल्याने शिवसेनेला खूप वेळ मिळालेला आहे. शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. केंद्र व राज्यातील सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यात विधानसभेत शिवसेनेचे 155 आमदार आणि लोकसभा निवडणुकीत 18 खासदार निवडून येतील. महत्त्वाचे म्हणजे, पुढचा पंतप्रधान कोण असेल, हे शिवसेनेचे खासदारच ठरवतील, असा ठाम विश्‍वास शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्‍त केला. 

औरंगाबाद : गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी ऐनवेळी शिवसेना-भाजप युती तुटली होती. तेव्हा शिवसेनेला वेळ मिळाला नव्हता. तरीही 63 आमदार निवडून आले; परंतु या वेळी आताच स्वबळाचा नारा दिल्याने शिवसेनेला खूप वेळ मिळालेला आहे. शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. केंद्र व राज्यातील सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यात विधानसभेत शिवसेनेचे 155 आमदार आणि लोकसभा निवडणुकीत 18 खासदार निवडून येतील. महत्त्वाचे म्हणजे, पुढचा पंतप्रधान कोण असेल, हे शिवसेनेचे खासदारच ठरवतील, असा ठाम विश्‍वास शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्‍त केला. 

"कॉफी विथ सकाळ' या उपक्रमाचे शुक्रवारी (ता. 23) "सकाळ' कार्यालयात आयोजन केले होते. या वेळी खासदार खैरे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. "सकाळ'च्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी त्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.

खासदार खैरे म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुखांनी आता महाराष्ट्राबाहेरही निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात एकटे लढून शिवसेनेची ताकद दाखविण्याची संधी आहे. गेल्यावेळी ऐनवेळी ज्या जागा भाजपच्या वाट्याच्या होत्या त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जाहीर करावे लागले, तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता; मात्र आता परिस्थिती निराळी आहे. शिवसेना सत्तेत असताना अविश्‍वास दाखविला जातो आहे, अपमानित व्हावे लागत आहे.'' 

मित्रपक्षांनाच देतात विरोधकांसारखी वागणूक 
शिवसेना हा आघाडीतील घटकपक्ष आहे; मात्र मित्रपक्षांना विरोधी पक्षाप्रमाणे वागणूक दिली जाते. पंतप्रधानांना भेटण्यासाठी 13 दिवस वेळ मिळत नाही. शिवसेना खासदारांनी त्यांची भेट घेतली, त्या वेळी आमच्याशी गोड-गोड गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही वृत्तवाहिन्यांवर पाहतो तर काय, खासदारांना सुनावले, असे वृत्त झळकत होते, अशी त्यांची बनवाबनवी सुरू आहे. विरोधात बोलणाऱ्यांमागे चौकशांचे शुक्‍लकाष्ठ लावून दिले जाते. ही राजकीय दहशत योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणा फसव्या निघाल्या. लोकांमध्ये याविषयी चीड आहे. यामुळे अशांसोबत कशाला राहायचे, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेना युतीमधून बाहेर का पडत नाही, असे विचारले जाते. सत्तेत राहून भाजपवर अंकुश ठेवता यावा यासाठी शिवसेना सत्तेत असल्याचे समर्थन श्री. खैरे यांनी केले. 

आम्ही शिवसेनेच्या नावावर निवडून येतो 
औरंगाबाद मतदारसंघात मी स्ट्रॉंग उमेदवार असल्यामुळे भाजपने माझ्या मतदारसंघात अनेक सर्व्हे केले; पण या सर्व्हेत चंद्रकांत खैरे हेच नाव येत असल्याने माझ्याविरोधात सुभाष पाटील यांना पैसे देऊन पुढे केले. एवढेच नाही, तर नारायण राणे यांच्या औरंगाबादेतील सभेचा खर्च भाजपने केला आहे. भाजप माझ्याविरोधात उभे राहणाऱ्या उमेदवारावर तीस कोटी रुपये खर्च करणार आहे. लोकांना कळलंय हा पैसा कुठून आला? आम्ही शिवसेनेच्या नावावर निवडून येत असतो. यावेळीही 1 लाख 35 हजारांच्या मताधिक्‍याने निवडून येईन, असा दावाही खासदार खैरे यांनी केला. 

"ईव्हीएम'ऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्या 
गुजरात निवडणुकीसह देशभरात झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ घालून भाजपने निवडणुका जिंकल्या आहेत. सुरतमध्ये "जीएसटी'विरोधात देशातील सर्वांत मोठा मोर्चा निघाला होता. नोटाबंदी, जीएसटीनंतर एक वर्ग भाजपवर नाराज असतानाही त्यांनाच कसे मतदान केले? त्यामुळे येणारी निवडणूक "ईव्हीएम'ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावी, अशी आम्ही मागणी करणार आहोत. कॉंग्रेस व इतर पक्षांचीही हीच मागणी आहे. 

आज वाईट वाटते 
कॉंग्रेस सरकारच्या काळात मी विरोधी पक्षात होतो. तरीही आम्हाला मानसन्मान मिळत होता. कोणताही निर्णय घेताना आमचेही मत जाणून घेतले जात होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याची चर्चा करायचे. अटलबिहारींनी 14 घटकपक्ष घेऊन सरकार चालवले. त्यांच्या काळात आम्ही अनेक कामे केली. अनेक योजनांसाठी मदत झाली; मात्र आज आम्हाला वाईट वाटते. साध्या गोष्टींतही आम्हाला वाईट अनुभव येत आहेत. 

दिल्लीत मराठी खासदारांना मदत 
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये माझा उल्लेख केला. मी पाच वेळा खासदार झालो असे ते म्हणाले; मात्र मी आतापर्यंत चार वेळा खासदार झालो आहे. कदाचित, यापुढच्या माझ्या विजयाचा त्यांनी उल्लेख केला असावा, असे खासदार खैरे मिश्‍कीलपणे हसत म्हणाले. मी नेहमीच मोठ्यांचा आदर करीत आलो आहे. खासदार पवार यांनी दिल्लीमध्ये मराठी खासदारांना नेहमीच मदत केली आहे. शहरासाठी पाण्याची योजना मंजूर करण्यासाठी त्यांची मला खूप मदत झाली. 

भाजपने बंद पाडली "समांतर' योजना 
"समांतर' पाणी योजनेच्या विरोधात भाजपच्या लोकांनी वारंवार आंदोलने करून योजना बंद पाडल्याचा आरोप श्री. खैरे यांनी केला. आज तेच काहीही करून शहराचा पाणीप्रश्‍न सोडवा, अशी मागणी करीत आहेत. ही योजना भाजप खासदारांचीच आहे, हे त्यांना मी सांगितले होते; मात्र त्यांनी ऐकले नाही. योजना बंद पडल्याने शहर पाच वर्षे मागे गेले आहे; मात्र योजनेशिवाय शहराला पाणी मिळणार नाही, भूमिगत गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

150 कोटींच्या रस्त्यांमुळे खड्ड्यांतून सुटका 
राज्य शासनाने दिलेले शंभर कोटी व महापालिकेचे 50 कोटी अशा दीडशे कोटींतून शहरात 52 रस्ते होत आहेत. त्यामुळे शहरवासीयांची खड्ड्यांतून मुक्तता होणार आहे. महापालिकेच्या निधीतून शहराच्या गल्लीबोळात सिमेंट रस्त्यांची कामे होत असल्याचा दावा त्यांनी केला. 

"स्मार्ट सिटी'चा निधी मी आणला 
शहर पूर्वी छोटे होते ते आज खूप विस्तारले आहे. एका मतदारसंघाचे तीन मतदारसंघ झाले आहेत. ही वाढ माझ्यामुळे होऊ शकली. नंतर कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले, तरी शेंद्रा पंचतारांकित वसाहतीमध्ये डीएमआयसी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 हे प्रकल्प मी आणले. स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात यावा, यासाठी केंद्राकडे मी पाठपुरावा केला व निधी आणला, असा दावा श्री. खैरे यांनी केला. 

... म्हणून "सकाळ' आवडतो 
माध्यमांमध्ये टेबल स्टोऱ्या लिहून कवित्व केले जाते; मात्र अपवाद आहे तो "सकाळ'. "सकाळ'मध्ये कधीच टेबल स्टोरी नसतात. सकारात्मक बातम्या असतात म्हणून मला "सकाळ' आवडतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानेच मी सर्वसामान्य शिवसैनिकापासून उच्च नेतेपदापर्यंत पोहचू शकलो. मी सैनिक म्हणून शिवसेनेत आलो आहे, सैनिक म्हणूनच राहीन. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनीच माझी शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली, असे सांगून औरंगाबादमधील शिवसेनेच्या वाटचालीचाही यावेळी श्री. खैरे यांनी धावता उल्लेख केला. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live