म्हसळा तालुक्यात पोलिस पाटलांची कमतरता

म्हसळा तालुक्यात पोलिस पाटलांची कमतरता

म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यात ८१ महसुली गावे आहेत. गाव तेथे पोलिस पाटील असे सरकारचे धोरण असून, तालुक्‍यात केवळ २८ पोलिस पाटील कार्यरत आहेत. कार्यरत पोलिस पाटील हे मयत किंवा निवृत्त झाल्याने १२ गावे पोलिस पाटलांच्या नेमणुका अगर कार्यभार दिला नसल्याने वाऱ्यावर असल्याची माहिती पुढे येत आहे. म्हसळा पोलिस ठाण्याला तालुक्‍यातील ६६ गावे, दिघी सागरी पोलिस ठाण्याला सात गावे आणि गोरेगाव पोलिस ठाणे अंतर्गत आठ गावे येत आहेत.

गावांमध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच चोरी, चोरीचा माल, कैदी, संशयित मृत्यू, विविध प्रकारच्या गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांना वेळोवळी माहिती देणे आणि प्रामुख्याने तलाठी, ग्रामसेवक आणि पोलिस अधिकाऱ्यांना विविध तपासात नियमित सहकार्य करण्याचे काम; तसेच साथीचे आजार, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या महत्त्वाच्या कामात पोलिस पाटील चांगली भूमिका करत असतात.

पोलिस पाटलांचा कार्यभार 
ग्रामीण भागात मुंबई नागरी कायदा १८५७ नुसार हे पद निर्माण करण्यात आले. गावांमध्ये पोलिस पाटलांकडे कायद्याचा प्रथम पालक म्हणून पाहिले जाते. कायदा व सरकारचे काम करताना पोलिस पाटलांना अनेक अडचणी येतात. घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावताना पोलिसांना योग्य ती माहिती व गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांच्या अटकेपर्यंतची मदत पोलिस पाटील करत असतो.

नव्या सरकारने पोलिस पाटलांच्या नेमणुका आरक्षणानुसार आणि लेखी चाचणी परीक्षा घेऊन पदे भरण्याचे नियम केले. काही गावांतून आरक्षणाप्रमाणे लोकवस्ती नसते. म्हसळा तालुक्‍यांतील अनेक गावांत शाश्वत विकास होत असल्याने अतिरिक्त कार्यभार झेपणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सरकारने रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्‍यक आहे.
- अनंत पाटील, अध्यक्ष, म्हसळा तालुका पोलिस पाटील संघटना

पोलिस पाटलांची उपविभागनिहाय बिंदू नामावली अद्ययावत करून त्यांची भरती प्रक्रिया संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत केली जाते. म्हसळा व श्रीवर्धन तालुक्‍यातील रिक्त पदांची माहिती रायगड जिल्हाधिकार्!यांना सादर करण्यात येईल. त्यांनी आदेश दिल्यावर कार्यवाही पूर्ण होईल.
- अमित शेडगे, उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन

रिक्त असलेली तालुक्‍यातील गावे
कुडतोडी, ढोरजे, मोरवणे, देहेन, वांगणी, भापट, ताम्हने करंबे, कोलवट, चिरगाव, भेकऱ्याचा कोंड, रातीवणे, रोहिणी.

Web Title shortage police patil mhasala

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com