लॉकडाऊन आता पूर्ण उठवायला हवा? वाचा, मनसेने केलेल्या सर्व्हेतून काय आलं समोर?

साम टीव्ही
बुधवार, 26 ऑगस्ट 2020
  • लॉकडाऊन आता पूर्ण उठवायला हवा?
  • तुम्हाला लॉकडाऊन हवा की नको?
  • मनसेने केलेल्या सर्व्हेतून काय आलं समोर?

बंद दुकानं... सामसूम रस्ते आणि प्रत्येकजण घरात बसून... सुमारे 5 महिन्यांपासून सगळीकडे हे चित्र आहे. आता लॉकडाऊन शिथिल झालाय, मात्र अजूनही काही बाबतीत लॉकडाऊन आहेच. त्यामुळे यापुढे लॉकडाऊनचं करायचं काय? असा प्रश्न मनसेनं एका सर्व्हेत लोकांना विचारला. पाहूयात, मनसेकडून केलेल्या सर्व्हेत काय आला निष्कर्ष.

ओस पडलेली शहरं... चिडीचूप झालेली गावं... माणूस काणूस नाही आणि दुकानांचे शटर बंद... हे असं चित्र गेले 5 महिने सर्वत्र दिसत होतं. गेल्या काही दिवसांत लॉकडाऊन शिथिल केला असला तरी काही प्रमाणात अजूनही लॉकडाऊन सुरूच आहे. कोरोनाला सोबत घेऊन काळजी घेत जगण्याची मानसिकता आता लोकांची झालीय, त्यामुळे लॉकडाऊन उठवायला हवा अशीही मागणी केली जातेय. हाच जनमानसाचा कानोसा घेण्यासाठी मनसेकडून एक सर्व्हे करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या या सर्व्हेत 54 हजार 177 लोकांची मतं जाणून घेण्यात आली. त्यात लॉकडाऊन उठवण्याकडे लोकांचा कल असल्याचं दिसून आलंय.

लॉकडाऊनमुळे तुमच्या नोकऱ्या गेल्या का?पाहा सर्व्हेतून काय आलं समोर
होय – 89.8 टक्के
नाही – 8.7 टक्के

रेल्वेसे आणि एसटी पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?
होय – 76.5 टक्के
नाही – 19.4 टक्के

लॉकडाऊनच्या काळात वीज बिलांबद्दल समाधानी आहात का? या प्रश्नावर 8.3 टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलंय. तर नाही असं उत्तर 90.2 टक्के लोकांनी दिलंय.

लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय मदत वेळेत मिळाली का? असा प्रश्न विचारला असता होय असं उत्तर 25.9 टक्के
लोकांनी दिलंय. आणि 60.7 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय.

लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामाबद्दल समाधानी आहात का? हा प्रश्न जेव्हा लोकांसमोर आला तेव्हा 28.4 टक्के लोक होय बोलले, तर  63.6 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय.

70.3 टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे असं वाटतं, तर 26 टक्के लोकांना लॉकडाऊन उठवू नये असं वाटतं.

आता लॉकडाऊन संपूर्णपणे  उठवायला हवा, हेच मत लोकांनी मनसेनं केलेल्या या सर्व्हेत मांडलंय. आरोग्याची काळजी घेत उद्योगधंदे सुरू झाले पाहिजेत, जनजीवन पूर्ववत व्हायला हवं असंही लोक म्हणतायत. मात्र, तरीही कोरोना अजून संपलेला नाही, त्याच्यावर लसही अजून आलेली नाही, त्यामुळे जे काय करायचं ते काळजी घेत, नियम पाळतच करायला हवं. हेही तितकंच खरं.


संबंधित बातम्या

Saam TV Live