सर्जन ते सृजनशील अभिनेता - डॉ. श्रीराम लागू

सोनाली शिंदे
बुधवार, 18 डिसेंबर 2019

या अगणित माणसांच्या दुनियेतदेखील फक्त एकच असा माणूस मला ठाऊक आहे. जो त्याच्या जागेवर ठामपणे उभा असतो आणि तो मी आहे. मी आहे ज्युलिअस सीजर...मी आहे अथेलो... मी आहे प्रतापराव...हॅम्लेट... सुधाकर... आणि मी आहे गणपतराव बेलवलकर.. नटसम्राट..

या अगणित माणसांच्या दुनियेतदेखील फक्त एकच असा माणूस मला ठाऊक आहे. जो त्याच्या जागेवर ठामपणे उभा असतो आणि तो मी आहे. मी आहे ज्युलिअस सीजर...मी आहे अथेलो... मी आहे प्रतापराव...हॅम्लेट... सुधाकर... आणि मी आहे गणपतराव बेलवलकर.. नटसम्राट..


डॉ. श्रीराम लागू...नटसम्राट!... रंगमंचाचा पडदा व्यापून टाकणारा कलाकार. आपल्या सामाजिक भानाने व तत्वनिष्ठतेने अभिनयाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा प्रतिभावंत अभिनेता. २० हून अधिक मराठी नाटकं, १०० हून अधिक हिंदी सिनेमे, ४० हून अधिक मराठी सिनेमे असा चार दशकं गाजवणारा कलाकार!

मास्तर ते ‘सामना’ प्रवास

कारकिर्दीच्या सुरुवातीलाच १९७२ मध्ये पहिला चित्रपट केला ‘पिंजरा’. या पहिल्या सिनेमातच त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र शैली उमटवली. वि. वा. शिरवाडकर लिखित ’नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका तर त्यांनी अजरामर केली. एकीकडे नाटक आणि दुसरीकडे सिनेमा या दोन्ही पातळ्यांवर ते यशस्वीपणे कसदार अभिनयाची वाटचाल करत राहिले. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ‘हिमालयाची सावली’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘एकच प्याला’, ‘गिधाडे’,  ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘आंधळ्यांची शाळा’ ही त्यांच्या गाजलेल्या नाटकांमधली काही नावे. तर दुसरीकडे  ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘सुंगधी कट्टा’, ‘मुक्ता’, ‘ध्यासपर्व’ या सिनेमांनी दबदबा तयार केला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सामना व सिंहासन या राजकीयपटांतील लागू व निळू फुलेंच्या जोडीने आपल्या अभिनयाद्वारे सिनेमा अधिकचं फुलवला. मराठीत रंगभूमी व सिनेमांची कसरत सांभाळत त्यांनी काही हिंदी सिनेमातही अनेक व्यक्तीरेखा साकारल्या. नसरुद्दीन शहांसारख्या अनेक अभिनेत्यांवर त्यांचा प्रभाव राहिला. त्यांचं ‘लमाण’ हे आत्मचरित्र, ‘झाकोळ’, ‘रुपवेध’ ही पुस्तकेही प्रकाशित झालीये.

विवेकवादी नट


न पटणाऱ्या अनेक गोष्टींवर ठाम मत व्यक्त करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरुन वादही झाले. “देवाला रिटायर करा” या त्यांच्या विधानावरुन वादंग झाला होता. पण ते डगमगले नाहीत. गांधी विचारांचा पुरस्कार करणारा हा कलाकार. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय. या नाटकात त्यांनी काम करायला नकार दिला होता. पण त्यांचा विरोध हा द्वेषी नव्हता. याच लागूंनी घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना विरोध होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडत ठाम भूमिका घेतली. एवढचं काय स्वत: गांधीवादी असूनही नथुराम गोडसेची देऊळे बांधण्याबद्दल त्यांनी अतिशय सम्यक भूमिका घेतली होती.

सामाजिक जाणिवेचा नटसम्राट

अभिनेता, कलाकार अनेकजण झाले, होतील. पण लागूंइतका सामाजिक भान जपणारा आणि या सामाजिक भानातून कलेला अधिक समृद्ध करणारा दुसरा कोणी नाही. विचारांसोबत प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी आपले सामाजिक योगदान दिले. उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “सामाजिक कृतज्ञता निधी”चे ते संस्थापक-अध्यक्ष होते.

डॉ. लागूंचा मुलगा तन्वीर याचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी ‘तन्वीर सन्मान’ पुरस्कार सुरु केला होता. नुकताच हा कार्यक्रम पुण्यात पार पडला. लागूंच्या आयुष्यातील शेवटचा जाहीर कार्यक्रम. वृद्धापकाळामुळे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा नटसम्राट काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांच्या भावना त्यांच्या नाटकातल्याच एक संवादाप्रमाणे आहेत- “विधात्या...तु इतका कठोर का झालास”


संबंधित बातम्या

Saam TV Live