परभणीत पाऊस मोजणीच्या मापात पाप? 

साम टीव्ही
शनिवार, 13 जून 2020

परभणीत नेमका किती पाऊस ? 
पाऊस मोजणीच्या मापात पाप ? 
पावसाच्या आकड्यात तफावत !

परभणीत परवाच्या रात्री तुफान पाऊस झाला. पण, याच पावसानं प्रशासन चांगलंच चक्रावलंय. अखेर प्रशासनानं या पावसाचा शोध घेण्यासाठी सत्यशोधन समितीच नेमलीय.

जगात जर्मनी देशात परभणी. अशी परभणीची ख्याती आता हीच परभणी पावसामुळे चर्चेत आलीय. त्याचं झालं असं ११ जूनच्या रात्री परभणीत तुफान पाऊस झाला. रात्री १ ते पहाटे ५ असा चार तास हा पाऊस झाला. याच चार तासांत परभणीत तब्बल १८६.२ मिमी पाऊस पडल्याचा दावा भारतीय हवामान खात्यानं केलाय. परभणीतल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरात असलेल्या वेधशाळेत तशी याची नोंदही करण्यात आलीय. मात्र, याच वेधशाळेपासून अवघ्या एक-दीड किलोमीटर अंतरावर महसूल विभागाचं पर्जन्यमापक आहे. तिथे ८५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झालीय. आता आणखी गंमत पुढेच आहे. महसूल विभागाच्या या कार्यालयापासून ३ किलोमीटर अंतरावर कृषी विद्यापीठाची वेधशाळा आहे. तिथे या पावसाची नोंद झालीय ५८.८ मिमी....! 

एकाच शहरात ठराविक अंतरावर असलेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची वेगवेगळी आकडेवारी पाहून प्रशासनही चक्रावून गेलंय. अखेर यातला खरा आकडा कोणता हे शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सत्यशोधन समितीच नेमलीय. पाच जणांची समिती पावसाची खरी आकडेवारी शोधणार आहे. आणि त्याचा अहवाल दोन दिवसांत देणार आहे. मात्र, या समितीवर शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतलाय. 

वास्तविक, पावसाच्या आकडेवारीच पेरणी आणि पुढे दुष्काळ, पीक विमा याबाबतचं सरकारी धोरण ठरत असतं. पण, याच आकडेवारीत तफावत असेल तर काय करायचं असा सवाल आता उपस्थित झालाय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live