सिंधुदुर्गातून गोव्यास रोज 40 टन मासळीची वाहतूक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मालवण - मासळीवरील बंदी अंशतः उठवल्यानंतर जिल्ह्यातून रोज 35 ते 40 टन मासळी गोव्यात जावू लागली आहे; मात्र लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी गोव्याचे मार्केट अजूनही बंदच आहे.

मालवण - मासळीवरील बंदी अंशतः उठवल्यानंतर जिल्ह्यातून रोज 35 ते 40 टन मासळी गोव्यात जावू लागली आहे; मात्र लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी गोव्याचे मार्केट अजूनही बंदच आहे.

परराज्यांतील मासळीला गोवा सरकारने 12 नोव्हेंबरपासून घातलेली बंदी 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर अंशतः उठविण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा उठवत सिंधुदुर्गमधील छोट्या मच्छीमारांनी मासळी तिकडे पाठविण्यास सुरवात केली; मात्र बंदी उठविल्याचा फायदा रत्नागिरीतील मच्छीमारांना अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे येथील मच्छीमारांना केरळ, कर्नाटकसह मुंबईच्या बाजारपेठांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

परराज्यांतील मासळीला गोवा सरकारने सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती. बंदीच्या अंमलबजावणीमुळे सिंधुदुर्गासह कोकणातील मत्स्य व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. इन्सुलेटेड वाहनातून आणलेल्या मासळीला परवानगी देण्यात आलेली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सौंदळा, पापलेट, सुरमई यांसारखे मासे गोव्यात जाऊ लागले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून मिळून सुमारे 35 ते 40 टन मासळी तिकडे जात आहे. त्यातून चांगला दर मिळत आहे. असे असले तरी पर्यटन हंगामामुळे गोव्यातून सध्या मागणी इतकी वाढली आहे, की स्थानिक बाजारपेठेत ताजा मासा मिळणे मुश्‍कील झाले आहे.

"गोव्यातील माशांची मागणी आणि पुरवठा यांमधील तफावत मोठी होती. सरकारने गेल्या आठवड्यात अंशतः बंदी उठवल्यानंतर कारवार आणि कोकणातून पुरवठा सुरू झाला. प्रीमियर गटातील किंग फिश, स्नॅपर, पॉम्फेट, टायगर प्रॉन्स आदी माशांचा तुटवडा कायम असल्याने माशांचे दर 30 ते 35 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.''
- राल्फ डिसोझा, उपाध्यक्ष, गोवा मर्चंटस चेंबर ऍण्ड इंडस्ट्रीज

""रत्नागिरी जिल्ह्यातून गोव्यात अद्यापही मासळी जाण्यास सुरवात झालेली नाही. बंदी उठविण्यात आल्याचे येथील मच्छीमारांना माहिती नाही.''
- पुष्कर भुते, मच्छीमार नेते


संबंधित बातम्या

Saam TV Live