पीएमपीच्या ताफ्यात 65 'स्मार्ट' बसेस दाखल

पीएमपीच्या ताफ्यात 65 'स्मार्ट' बसेस दाखल

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी पीएमपीच्या ताफ्यात 65 नव्या बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बसची कमतरता काही प्रमाणात का होईना भरून निघणार आहे. या बस प्रामुख्याने बीआरटी मार्गावर धावतील, असे नियोजन पीएमपी प्रशासनाने केले आहे. 

पीएमपीत दाखल झालेल्या या बसची प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांची मार्गांवर धावण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बुरसे यांनी दिली. उर्वरित 67 ई-बस आणि 368 सीएनजीवरील बस दोन महिन्यांत येण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पुणे आणि पिंपरीमधील बीआरटी मार्गांवर या बस धावणार असून, त्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. तसेच, स्मार्ट सिटीमधील प्रवाशांनाही त्यांचा वापर करता येईल अशा पद्धतीने मार्गांची रचना केली आहे, असे बीआरटी सेलचे व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी (ता. 11) आहे. त्यात बस कशा पद्धतीने आणि कोठून सुरू करायच्या, याचा निर्णय होणार आहे. तसेच, बसचा लोकार्पण सोहळा करण्याबाबतही नियोजन करणार आहे. 

बडतर्फ कामगारांबाबत उद्या निर्णय 
भ्रष्टाचार, कामात हलगर्जीपणा, दांड्या मारणे, पीएमपीचे नुकसान होईल अशा पद्धतीने वर्तन करणे, गैरवर्तन करणे आदी कारणांवरून पीएमपी प्रशासनाने 25 कर्मचाऱ्यांना नुकतेच बडतर्फ केले आहे. चालक, वाहक, मेकॅनिक आदींचा त्यात समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची 6 ते 8 महिने खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. परंतु, त्यांनी संचालक मंडळाकडे अपील केले आहे; त्यावर गुरुवारी अंतिम निर्णय होणार आहे. 

प्रवाशांसाठी 65 बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बसचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर या बस प्रवाशांसाठी तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील. 
- नयना गुंडे,  अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

अशा आहेत बस.... 
- 33 ई-बस (वातानुकूलित) 
- 32 सीएनजीवर धावणार 
- दोन्ही बस 12 मीटर लांबीच्या 
- 32 प्रवाशांसाठी बैठकव्यवस्था 
- दोन्ही बाजूने दरवाजे

Web Title: sixty five new buses of PMP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com