झोप आणि निद्रानाश

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जानेवारी 2018

शांत झोपेसारखे सुख नाही. पण काही कारणाने रात्रीची सुखाची झोप उडते. त्यावेळी झोपमोडीची कारणे शोधा आणि त्यावर उपाय करा. झोपेची औषधे मात्र वैद्यकीय सल्ल्याखेरीज घेऊ नका.

शांत झोपेसारखे सुख नाही. पण काही कारणाने रात्रीची सुखाची झोप उडते. त्यावेळी झोपमोडीची कारणे शोधा आणि त्यावर उपाय करा. झोपेची औषधे मात्र वैद्यकीय सल्ल्याखेरीज घेऊ नका.

मेंदूत प्रामुख्याने दोन प्रकारच्या पेशी असतात. त्यातील प्रमुख पेशी म्हणजे न्यूरॉन पेशी आणि दुय्यम म्हणजे ग्लाथा पेशी. न्यूरॉन पेशींची संख्या तीस अब्ज असावी आणि या संख्येच्या पाच ते दहा पट ग्लाथा पेशी असाव्यात, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. न्यूरॉन पेशींमुळे मेंदूचे कार्य होते. या न्यूरॉन पेशी एकमेकांशी सतत संपर्क साधून असतात. हे काम विद्युत-रासायनिक पद्धतीने अहोरात्र चालू असते. यातील विद्युत कार्याचा आलेख काढता येतो, याला इलेक्‍ट्रो-एनसेफेलोग्रॅम म्हणतात. झोपेचा अभ्यास करण्याकरिता व्यक्तीच्या मस्तकाच्या बाहेरून विविध ठिकाणाहून विजेचे प्रवाह टिपले जातात.

या अभ्यासावरून झोपेचे दोन वेगवेगळे प्रकार असल्याचे समजलेले आहे. पहिल्या प्रकाराला रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप म्हणतात, तर दुसऱ्या प्रकाराला नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप म्हणतात. या नॉन रॅपिडमध्ये आय मूव्हमेंट स्लीपच्या स्टेज-१, स्टेज-२, स्टेज-३ व स्टेज-४ अशा चार स्थिती ओळखल्या जातात. यापैकी स्टेज-३ आणि स्टेज-४ यात व्यक्तीला गाढ झोप लागलेली असते. बहुतेक वेळा आर-ई-एम्‌ स्लीप (रेम स्लीपमध्ये) मध्ये माणसाला स्वप्ने पडतात. दर रात्री चार ते पाच वेळा रेम स्लीप येते. (दीड ते दोन तासांनी) झोपावयाला गेल्यावर १२० मिनिटांनी पहिली रेम स्लीप येते, ती दहा मिनिटे टिकते. नंतरच्या झोपेत रेम स्लीपचा काळ वाढतो. जागे होण्यापूर्वी माणसाला पंचवीस पासून चाळीस मिनिटांपर्यंत रेम झोप येते. 

नॉन रेम स्टेज-४ (अत्यंत गाढ झोप) झोपेच्या सुरवातीच्या काळात येते. वय जसे वाढत जाते तशी स्टेज-३ व स्टेज-४ ची झोप (गाढ झोप) कमी होते, परंतु रेम झोपेचे प्रमाण तेवढेच राहते. वाढत्या वयात झोपेचे तुकडे पडू लागतात व झोपेच्या दोन तुकड्यांमधला वेळ व्यक्ती जागी राहते. मध्ये मध्ये येणारे जागेपण, लवकर झोपावयास जाणे आणि दिवसा झोप घेणे यामुळे व्यक्ती ‘निद्रानाशा’ची तक्रार करू लागते. झोप कमी मिळू लागली, तर नवनिर्मिती क्षमता आणि अपरिचित परिसराला योग्य प्रतिसाद घेण्याची क्षमता दोन्ही कमी होतात.

रात्री सलग झोप न येणे, झोप लागण्यास वेळ लागणे, रात्री अधूनमधून सारखी जाग येणे व जाग आल्यावर झोप लगेच न लागणे, भल्या पहाटेच (पहाटे दोन-अडीच वाजताच) झोप उडणे, अशा प्रकारे निद्रानाशाचे रुग्ण तक्रारी करतात. तत्कालिक निद्रानाश हा फार महत्त्वाचा नसतो. चहा, कॉफी (किंवा कॅफेन प्रकारची द्रव्ये असणाऱ्या चॉकलेट, कोकाकोला इत्यादि) यांचे अतिरेकी सेवन, मानसिक तणाव, शारीरिक त्रास (खोकला, दम, वेदना इत्यादि) दिवसा झोप काढणे, रात्री लवकर झोपावयास जाणे, अशी कारणे या तात्पुरत्या झोपमोडीच्या मुळाशी असतात. दीर्घकाळ निद्रानाशाच्या कारणात नैराश्‍य हे महत्त्वाचे कारण असू शकते. अशा व्यक्तीला सलग झोपेत सारखे व्यत्यय येतात. एकंदर झोपेची वेळ कमी होते, रेम स्लीपची स्थिती झोपेला गेल्या-गेल्याच येऊ लागते आणि बहुतेक सगळी रेम स्लीप रात्रीच्या पहिल्या झोपेतच संपते. गाढ झोपेचे प्रमाण बरेच घटते. उन्माद झालेल्या व्यक्तीलादेखील एकूण झोपेची गरजच कमी होते. उन्माद झालेल्या व्यक्तीला थोड्या-थोड्या वेळाने रेम स्लीप लागू लागते व एकूण रेम स्लीपचे प्रमाण वाढते.

प्रत्येक व्यक्तीला दर रात्री झोपेत स्वप्ने पडतातच. झोपेतसुद्धा ‘मन’ कार्य करीतच असते व या मनाच्या कार्यामुळे झोपेत स्वप्ने पडतात. सुरवातीला नमूद केल्याप्रमाणे बहुतेक स्वप्ने रॅपिड आय्‌ मूव्हमेंट स्लीपमधे पडतात. डोळे एकीकडून दुसरीकडे झपाट्याने हलतात, परंतु डोके, हात, पाय यांची हालचाल करणारे स्नायू स्तब्ध असतात. रक्तदाब वाढतो, नाडीची गती जलद होते आणि श्वसनाची गती वाढते. पुरुषांत शिश्‍न आणि स्त्रियात मदनध्वज या भागात ताठरपणा येतो. झोपेच्या नॉन रेम स्टेज-२ आणि स्टेज-३ या मध्ये झोपेत काहींना खूप भीती निर्माण होते. (स्लीप रिलेटेड पॅनिक ॲटॅक्‍स) यातही दोन प्रकार असू शकतात. नाइटमेअरर्स पहाटे-पहाटे पडणाऱ्या भीतीदायक स्वप्नामुळे येतात. व्यक्ती जागी होते. या वेळेला आर-ई-एम झोपेची स्थिती असते. आपल्याला भीतीदायक स्वप्न पडल्याचे आठवते. स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे ही नाइटमेअर्स होतात. अशी भीतीदायक स्वप्ने रक्तदाब उतरवण्याच्या औषधांच्या सेवनामुळे कॉर्टिको स्टेरॉईडस्‌ प्रकारच्या रेणूंच्या सेवनाने किंवा मानसोपचारासाठी वापरलेल्या न्यूरो ट्रान्मिटरर्समुळे पडू शकतात. झोप लागोपाठ काही दिवस न लागलेली असणे, नेहमी मद्यपान करणाऱ्या किंवा झोपेची औषधे घेणाऱ्या व्यक्तीने मद्यपान किंवा झोप येण्याकरता वापरण्यात येणारी औषधे एकाएकी थांबविली जाण्याने अशी भीतीदायक स्वप्ने पडतात.

दुसऱ्या प्रकाराला नाइट टेरर्स म्हणतात. झोपलेली व्यक्ती जोरात ओरडते, उठून बसते. काल्पनिक शत्रूशी भांडते किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करते. असा प्रकार पंधरा मिनिटांपर्यंत चालतो. व्यक्ती गोंधळलेली असते; कमालीची अस्वस्थ झालेली असते. सारा प्रकार शमल्यावर व्यक्ती पुन्हा झोपून जाते. असे काही घडल्याचे नंतर व्यक्तीला आठवत नाही.

स्लीप टेरर्स झोपेला गेल्या-गेल्या सुरवातीलाच पडतात. या स्लीप टेरर्स पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील इतरांनाही असा त्रास होत असतो. स्लीप टेरर्स सहसा लहान मुलांना होतात. जेव्हा प्रौढ व्यक्तींना स्लीप टेरर्सचा त्रास होतो तेव्हा त्या व्यक्ती खूपच अस्वस्थ झालेल्या असतात, त्यांना प्रचंड प्रमाणात चिंता जाणवत असते आणि त्या व्यक्ती आक्रमक बनलेल्या असतात. अशा स्थितीत या व्यक्तींकडून जवळच्या माणसाला हाणामारीसुद्धा होऊ शकते. बेंझोडायाझिपीनस्‌ प्रकारच्या औषधांचा उपयोग होतो. (उदा. डायाझिपाय) काही व्यक्तींना डीप स्लीप हिप्नॉसिसचादेखील फायदा होतो.

निद्रानाश ही एक समाजात नेहमी आढळणारी व्यथा आहे. वाढत्या वयाबरोबर निद्रानाशाच्या तक्रारींचे प्रमाण वाढून ते चाळीस टक्के प्रौढ-वृद्धात होते. निद्रानाश होण्यामागे ‘सवय’ हा महत्त्वाचा घटक असू शकतो. एखाद्या व्यक्तीला काही कारणामुळे (शारीरिक, मानसिक, भावनात्मक, चिंता इत्यादि) काही रात्री झोप न लागल्यास मला ‘आज झोप येणार आहे किंवा नाही?’ या चिंतनेने ग्रासले जाते. अशा व्यक्तींना दुपारी चांगली झोप लागतेही. या दुपारच्या ‘डोळा लागण्याने’ रात्री जोप न येणे व पुन्हा दुपारी झोप लागणे हे चक्र सुरू होते. दुपारी झोप लागू नये या दृष्टीने कॉफीसारखे उत्तेजक पेये घेतले तर त्यातील कॅफेन या रेणूचा परिणाम सोळा तासांपर्यंत राहू शकतो, म्हणजे सकाळी दहा वाजल्यानंतर घेतलेल्या कॉफीचा परिणाम येणाऱ्या रात्री निद्रानाशात होतो! झोपण्यापूर्वी मद्यपान करण्याने भले सुरवातीला झापड येईलही, परंतु थोड्याच वेळाने वारंवार लघवीला जाण्याकरिता उठावे लागून झोपमोड होत राहील. काही रात्री झोप नीट झाली नाही तर थकवा जाणवतो, व्यायाम करावासा वाटत नाही, व्यायाम न झाल्याने पुन्हा शांत व गाढ झोप येत नाही! 

निद्रानाशावर उपचार मुख्यत्वे झोपेबद्दल घेण्याची आपल्या जीवनशैलीची काळजी ही होय, याला गुड स्लीप हायजीन म्हटले जाते. यामध्ये पुढील मुद्द्यांवर भर दिला जातो. १) चांगली झोप आल्याखेरीज बिछान्यावर झोपावयास जाऊ नये. २) आपली झोपण्याची जागा फक्त झोपेसाठी आणि शरीरसंबंधासाठीच वापरावी. बिछाना ही वर्तमानपत्रे किंवा पुस्तके वाचण्यासाठी, टीव्ही पाहण्यासाठी, शेव-चिवडा खाण्यासाठी वापरली जाण्याची जागा असू नये. ३) बिछान्यावर पडल्यावर वीस मिनिटे वाट पाहूनही झोप न आल्यास बिछाना सोडावा. माफक हालचाल घडेल अशी कामे करावीत.

उदाहरणार्थ, वर्तमानपत्रांच्या घड्या करून व्यवस्थित जागेवर ठेवणे, घरातील मंडळींची पादत्राणे व्यवस्थित लावणे, कपड्यांना इस्त्री करणे, ध्यानाची अवस्था येण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक ग्रंथाचे वाचन अथवा मनन करणे. ४) झोप केव्हाही लागली तरी सकाळी ठरलेल्या नेहमीच्या वेळेलाच उठावे. ५) शक्‍यतो कॅफेनयुक्त पेये/ पदार्थ पूर्ण वर्ज्य करावेत, निदान दुपारनंतर सेवन थांबवावे. (चहा, कॉफी, कोला पेये, चॉकलेट इत्यादि) तीच गोष्ट निकोटीन या रेणूला लागू पडते. (तंबाखूचे कोणत्याही प्रकारे सेवन). ६) नियमाने झेपेल त्याप्रमाणे व्यायाम घ्यावा. ७) मद्यपान कटाक्षाने वर्ज्य करावे. ८) संध्याकाळनंतर द्रव पदार्थ मर्यादित ठेवावेत. रात्री घेण्याची औषधे घेताना पाणी प्यावे लागत असल्यास शक्‍यतो संध्याकाळी घ्यावीत, कमीत कमी पाणी सोबत घ्यावे. ९) शवासन करावयास शिकावे, त्याचा सराव करावा. १०) ठरलेल्या वेळी झोपावयास जाण्याचा सराव ठेवावा. शक्‍यतो झोप येण्याची औषधे फक्त डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
 

Marathi News , Sleeping disorders 


संबंधित बातम्या

Saam TV Live