इन्कम टॅक्समध्ये साडेचार हजार कोटींची घट

इन्कम टॅक्समध्ये साडेचार हजार कोटींची घट

सव्वातीन लाख करदात्यांना नोटीस; यंदा 11 हजार कोटींचे उद्दिष्ट
सोलापूर - अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या उद्योजक, डॉक्‍टर, सुवर्ण व्यावसायिक यांच्यासह अन्य व्यक्‍तींना प्राप्तिकर भरणे बंधनकारक आहे. 2018-19 मध्ये मुंबई व नागपूर विभाग वगळता उर्वरित पुणे विभागातून 10 हजार 200 कोटींचा प्राप्तिकर जमा होणे अपेक्षित असतानाही फक्‍त पाच हजार 900 कोटी रुपयेच मिळाले.

त्यामुळे राज्यातील सुमारे तीन लाख 30 हजार 872 करदात्यांना प्राप्तिकर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्राप्तिकरात दरवर्षी 10 ते 20 टक्‍क्‍यांची वाढ होणे अपेक्षित आहे; परंतु मागच्या वर्षी त्यात निम्म्याने घट झाली. राज्यात बेरोजगारी वाढली असून, दुष्काळामुळे उत्पन्नात घट झाल्याचे कारण करदात्यांनी पुढे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा थेट परिणाम विकासकामांच्या निधीवर झाला आहे. दरवर्षी 15 जूनपर्यंत करदात्यांनी आयकराचा पहिला हप्ता, तर 15 सप्टेंबरपर्यंत दुसरा हप्ता भरणे बंधनकारक आहे.

दरम्यान, 5 जुलै रोजी नव्या केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार असून, त्यामध्ये करदात्यांसाठी कोणती सवलत मिळणार याचीही उत्सुकता आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 22 हजार करदात्यांपैकी चारशे करदात्यांनी 152 कोटी रुपये कमी भरल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असल्याचेही आयकरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्याची 2018-19 मधील स्थिती (आकडे कोटी रुपयांत)
10,200 - कर वसुलीचे उद्दिष्ट
5,900 - प्रत्यक्ष वसुली
4,300 - उद्दिष्टातील तूट
3,30,872 - करदात्यांना नोटीस

मुंबई व नागपूर विभाग सोडून अन्य विभागातील करात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार हजार कोटींची घट झाली आहे. करदात्यांनी 15 जूनपर्यंत प्राप्तिकर भरणे बंधनकारक आहे, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्राप्तिकर भरलेल्यांना नोटिसा बजावल्या आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत उर्वरित रक्‍कम दुसऱ्या हप्त्यात भरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
- बी. वाय. चव्हाण, अतिरिक्‍त आयुक्‍त, प्राप्तिकर विभाग, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Income Tax 4,500 Crore Less
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com