लातूरचा सुपुत्र झाला गुवाहाटी वायुतळाचा कमांडर!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 मे 2019

लातूर - आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

लातूर - आसाम राज्यातील गुवाहाटी येथे असलेल्या वायुदलाच्या बोरझर तळाचे एअर कमांडर म्हणून लातूरचे व्यंकट मरे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीने लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

लातूर जिल्ह्याला दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला आहे; मात्र गेल्या दोन दशकांपासून जिल्ह्यातील तरुण करिअरच्या वेगवेगळ्या वाटा शोधत विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत. उदगीर तालुक्‍यातील रहिवासी असलेल्या न्यायमूर्ती विजया कापसे या सध्या उच्च न्यायालयाच्या मद्रास खंडपीठाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी लातूरच्याच दोन न्यायाधीशांनी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या खंडपीठाचे प्रमुख न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या आणि हेलिकॉप्टर पायलट म्हणून सहा हजार तासांपेक्षा अधिकचा उड्डाणांचा अनुभव असलेल्या एअर कमांडर व्यंकट मरे यांनी नुकताच एअर कमांडर शशांक मिश्रा यांच्याकडून तळप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. 

शेतकरी कुटुंबात जन्म
निलंगा तालुक्‍यातील चिलवंतवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व्यंकट मरे यांनी १६ जून १९९० ला वायुदलाच्या उड्डाण विभागात सेवा सुरू केली. त्यांनी जम्मू-काश्‍मीर आणि पूर्वांचलच्या (सात राज्य) विविध मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी विलिंग्टनच्या सुरक्षा सेवा महाविद्यालयातून पदविका आणि महू येथील सेना महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आहे. यापूर्वी ते पूर्वांचल, अंदमान आणि निकोबार बेटावरील वायुदलाच्या तळावर कार्यरत होते. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या, कांगोतील लोकशाही प्रजासत्ताक मोहिमेतही महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे. वायुदलातील या महत्त्वपूर्ण वाटचालीस शुभेच्छा देताना व्यकंट मरे यांच्या वर्गमित्रांनी, आम्हाला खूप खूप अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

Web Title: Vyankat Mare Air Force Commander Success Motivation


संबंधित बातम्या

Saam TV Live