आपला महाराष्ट्र गुदमरतोय, वाचा काय घडलंय?

साम टीव्ही
रविवार, 6 सप्टेंबर 2020
  • आपला महाराष्ट्र गुदमरतोय
  • महाराष्ट्रातले व्हेंटिलेटर ऑक्सिजनवर
  • तुमच्या जिल्ह्यातले व्हेंटिलेटर बंद?

आपला महाराष्ट्र गुदमरतोय... हो खरंय... कारण आकडेच तसं सांगतायत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची जेवढी संख्या आहे त्याच्या तुलनेत व्हेंटिलेटरची संख्या अत्यंत कमी आहे... इतकंच नाही तर अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर बंद अवस्थेत आहेत.  साम टीव्ही आणि सकाळने केलेल्या पाहणीत काय विदारक वास्तव समोर आलंय पाहा

कोरोनाचा संसर्ग वाढतोय तसाच कोरोनामुळे मृत्यूंचा आकडाही वाढतच चाललाय. महत्त्वाची गोष्ट ही आहे की वेळेत ऑक्सिजन मिळाला नाही किंवा व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघालेयत. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा असणारे बेड एकतर कमी आहेत किंवा जे आहेत ते बिघडून धूळ खात पडलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या व्हेंटिलेटरची संख्या ही रुग्णांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहेत.

 आपला महाराष्ट्र गुदमरतोय
मुंबईच्या बीकेसी येथील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये अवघे 896 ऑक्सिजनयुक्त खाटा आहेत, तर पुण्यामध्ये आयसीयू बेड फक्त 189 उपलब्ध आहेत. तिकडे कोल्हापुरात व्हेंटिलेटरची सुविधा असणारे बेड फक्त 95 आहेत. औरंगाबादमध्येही फक्त 170 ऑक्सिजनयुक्त बेड आहेत. विदर्भातील नागपूरमध्ये सुमारे 200 आयसीयू बेड आहेत. इतकंच नाही तर नाशिकमध्ये 17 आणि कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील 16 व्हेंटिलेटर बंद पडले आहेत.

व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने आणि असलेले व्हेंटिलेटर बंद पडल्याने नाशिकमध्ये मनसेने आंदोलन केलंय. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा पाहता सरकारने आता तरी जागं व्हायला हवं, अशीच मागणी प्रत्येकजण करतोय.

याचाच अर्थ असा होतो की, सर्व सुविधा उपलब्ध केल्याचा बडेजाव सरकार मिरवत असलं तरी, तो पोकळ असल्याचं आता उघड झालंय. सरकारी अनागोंदी, आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार यामुळे महाराष्ट्र गुदमरतोय आणि महाराष्ट्राचा श्वास कोंडतोय. त्यामुळे कोरोनाच्या या जीवघेण्या संकटात सामान्य जनतेला कुणी वाली आहे की नाही? हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live