नॅशनल पार्कमधील 21 बिबटे गेले कुठे?

नॅशनल पार्कमधील 21 बिबटे गेले कुठे?

मुंबई : बिबट्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या गणनेचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. गेल्या वर्षी उद्यान प्रशासनाने केलेल्या गणनेत बिबट्यांची संख्या 41 वर पोहोचली आहे. परंतु 21 बिबट्यांनी राष्ट्रीय उद्यानातील मूळ आसऱ्यातून फारकत घेतल्याची माहितीही सर्व्हेक्षणातून समोर आली. उद्यानाबाहेर जाणाऱ्या बिबट्यांचा शोध घेण्यासाठी आगामी बिबट्यांच्या गणनेत रेडिओ कॉलरची मदत घेतली जाणार आहे. 

किमान तीन बिबट्यांचे रेडिओ कॉलरिंग करुन बिबट्यांचा प्रवास टिपला जाणार असल्याची माहिती उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद यांनी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या उद्यानातील 2017 सालच्या बिबट्यांच्या गणनेचा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला. कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून समोर आलेल्या आकडेवारीतून संपूर्ण उद्यानातील बिबट्यांची संख्या 41 वर पोहोचल्याचे समोर आले. यामध्ये 15 नर, 23 मादी व 3 बिबट्यांचे लिंग समजले नाही. याआधी 2015 साली कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातूनच उद्यानात 35 बिबटे आढळले होते. त्यात 6 नवे बिबटे दिसून आले. मात्र 2015 साली उद्यानातील पिल्लावळ मोठी होत ही संख्या आता 27 वर पोहोचली असल्याची आनंदाची बातमीही उद्यान प्रशासनाने दिली. 

दोन वर्षांपूर्वी उद्यानात जे पिल्लू होते ते आता प्रौढ झाल्याची शक्‍यता कॅमेरा ट्रेपच्या गणनेत आल्याची माहिती बिबट्यांची गणना करणाऱ्या निकीत सुर्वेने सांगितले. 2015 साली कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले 21 बिबटे गेल्या वर्षीच्या कॅमेरा ट्रेपमध्ये दिसून आले नाहीत. हे बिबटे कुठे गेलेत याचा केवळ अंदाज आपण देऊ शकतो असे सांगत इतर जंगलात शिरकाव, नैसर्गिक मृत्यू, शिकार आदी कारणांमुळे बिबटे कमी झाल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले. गायब झालेल्या दोन बिबट्यांचा उद्यानाच्या परिघाजवळ अनैसर्गिक मृत्यू झाला होता. रानडुक्करांसाठी लावलेल्या फासमध्ये अडकून उद्यानातील दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. 

आरेत मृत्यू पावलेल्या मादी बिबट्याची जागा दोन नव्या मादी बिबट्यांनी घेतली. आरे, गोरेगाव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही ठिकाणांच्या मूळ बिबट्यांनी आसरा सोडताच प्रत्येक ठिकाणी नवे बिबटे दाखल झाले. दोन वर्षांत उद्यानाने सात बिबटे गमावले. मात्र या कॅमेरा ट्रेपमध्ये बिबट्यांच्या सवयी, मिलन आदींबाबतची माहिती सर्व्हेक्षणातून समोर आल्याचे सुर्वे यांनी सांगितले. उद्यान मानवी हस्तक्षेपापासून बऱ्यापैकी सुरक्षित असल्याचा दावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अन्वर अहमद यांनी केला. आता उद्यानात एकही दारुभट्टी नसल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य -
1. 2011 , 2015, 2017 या तीन वर्षांत झालेल्या सर्वेक्षणात सहा बिबटे दरवेळी आढळले. 
2. 27 नव्या बिबट्यांचा वावर दिसून आला. 
3. इतर दोन अहवालांच्या तुलनेत यंदा संपूर्ण उद्यानात कॅमेरा ट्रेप लावले गेले. 49 ठिकाणी-कॅमेरा ट्रेप लावले गेले. संपूर्ण उद्यान दोन भागांत विभागून एप्रिल ते मे महिन्यात 22 दिवस कॅमेरा ट्रेप लावले गेले होते. 

सर्वेक्षणातील त्रुटी - 
1. 2015 साली बिबट्यांसाठी उद्यानातील भक्ष्यांचेही सर्व्हेक्षण दिले गेले होते. यंदाच्या सर्व्हेक्षणातून सांबार, माकड, उदमांजर आदी इतर वन्यजीवांची संख्या गायब. 
2. अतिक्रमणाचा मुद्दाही गाळला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com