राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी- विक्रम गोखले

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 मे 2019

अर्धवट माहितीच्या आधारे बनविलेली चुकीची मते ठामपणे कशी मांडावीत, याचे प्रशिक्षण विक्रम गोखले यांनी कदाचित मोदी यांच्याकडून घेतले असावे. 
संदीप देशपांडे, नेते, मनसे 

मुंबई: सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी, "लोकशाही धोक्‍यात आल्याचे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,' असे विधान केले होते. आज पुन्हा त्यांनी, "राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी असतात,' असे वक्‍तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मनसेनेही त्यांना खोचक टोला लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गोखले म्हणाले की, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भाषणे ही केवळ मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्यात. त्यांची भाषणे केवळ मनोरंजनासाठी असतात.

राज ठाकरेंचे व्हिडिओ किती खरे आणि किती खोटे आहेत, याबाबत कल्पना नाही. मात्र, मनोरंजनासाठी राज ठाकरेंची भाषणे बघावी आणि टाळ्या वाजवाव्यात. राज ठाकरे हे छोटे आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडिओ किती खरे किती खोटे आहेत, हे तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे, असे गोखले म्हणाले. 

शरद पवारांवरही टीका 
विक्रम गोखले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरदेखील टीका केली. शरद पवारांनी बारामतीचा विकास केला. मात्र, बारामतीसारखा विकास त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा करायला हवा होता. राष्ट्रवादी पक्षात एकमेव व्हिजनरी माणूस म्हणजे शरद पवार हे आहेत. मात्र, त्यांनी महाराष्ट्राचा विकास का केला नाही, असा सवालदेखील केला. या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली.

सरकारने नोटाबंदीचा निर्णय घ्यायला घाई केली. मी अर्थशास्त्रज्ञ नाही. मात्र, अर्थशास्त्रज्ञांनी नोटाबंदी ही चुकीची असल्याचे सांगितले आहे. ही नोटाबंदी नंतरही करता आली असती. नोटाबंदीमुळे काळा पैसा कुठेही थांबणार नाही. नोटाबंदीने काहीच साध्य झाले नाही, असेही ते या वेळी म्हणाले. 

अर्धवट माहितीच्या आधारे बनविलेली चुकीची मते ठामपणे कशी मांडावीत, याचे प्रशिक्षण विक्रम गोखले यांनी कदाचित मोदी यांच्याकडून घेतले असावे. 
संदीप देशपांडे, नेते, मनसे 


संबंधित बातम्या

Saam TV Live