सॅनिटायझरची फवारणी आरोग्याला हानिकारक...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 एप्रिल 2020

सॅनिटायझरच्या फवारणीमुळे त्वचारोग, घसा खवखवणे असे दुष्परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. 

कोरोनाविरोधी उपाययोजनांचा भाग म्हणून रेल्वेने सॅनिटायझर टनेल आणि एसटीने निर्जंतुकीकरण बस व निर्जंतुकीकरण कक्ष तयार केले आहेत; परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सॅनिटायझर फवारणी आरोग्याला हानिकारक असल्याचे स्पष्ट केल्यावर हा ‘देशी जुगाड’ बंद पडण्याची शक्‍यता आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी जंतुनाशक (सॅनिटायझर) फवारणी यंत्रे बसवण्यात आली. रेल्वेने सॅनिटायझर टनेल आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण वाहन तयार केले. तथापि, अल्कोहोल, क्‍लोरिन व अन्य रसायनांच्या फवाऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
 
कोरोनाबाधितांशी संपर्क, त्याच्या खोकण्यातून, शिंकेतून व त्याने हात लावलेल्या ठिकाणी हात लावण्यातून प्रादुर्भाव होतो. यावर उपाय म्हणून रेल्वेने सॅनिटायझर टनेल व एसटीने निर्जंतुकीकरण बस, कक्ष तयार करण्याचा सपाटा लावला होता.

कोणतीही परवानगी न घेताच हा ‘देशी जुगाड’ सुरू होता. आता आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर रेल्वे आणि एसटी प्रशासनाला अशा जंतुनाशक फवारणी यंत्रांचा वापर टाळावा लागणार आहे. 

 दुष्परिणाम 
सॅनिटायझरच्या फवारणीमुळे त्वचारोग, घसा खवखवणे असे दुष्परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. 

रेल्वे मंत्रालयाने सूचना केल्यावर सॅनिटायझर टनेल बंद करण्यात आला आहे. 
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे. 

निर्जंतुकीकरण बस कुठे वापरायच्या ते ठरले नव्हते. या बस बंदच आहेत. सॅनिटायझर फवारणीचे यंत्र कुठेही नाही. 
- शेखर चन्ने, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ. 


संबंधित बातम्या

Saam TV Live