एसटी खासगीकरणाच्या वाटेवर? 

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई : वातानुकूलित शिवशाही खाजगी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर व्यवस्थापनाने आता खाजगीकरणाची वाट धरली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांची दुरुस्ती खाजगी कार्यशाळेतून करण्यासाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ करणारे परिपत्रक महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आले आहे. 

मुंबई : वातानुकूलित शिवशाही खाजगी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर व्यवस्थापनाने आता खाजगीकरणाची वाट धरली की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांची दुरुस्ती खाजगी कार्यशाळेतून करण्यासाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ करणारे परिपत्रक महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये  व्होलवो व स्कँनिया बनावटीच्या हायटेक वातानुकूलित शिवनेरी, अश्वमेध व शिवशाही बसेसचा समावेश झाला आहे. सदर बस अपघातामध्ये नादुरुस्त झाल्यास त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था आपल्या कार्यशाळेत नसल्याने त्या बसेस खाजगी कार्यशाळेत दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

एसटीच्या मालकीचे पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे गाड्या निर्मिती व दुरुस्ती कार्यशाळा आहेत. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये नादुरुस्त गाड्या दुरूस्त करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तरीही महामंडळाने एसटी गाड्या दुरूस्त करण्यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात व्यवस्थापनाने कार्यशाळा व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांच्या खाजगी कार्यशाळातून दुरुस्ती खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. विभागीय नियंत्रकांना यापूर्वी खाजगी कार्यशाळेत वाहन दुरुस्त करण्यात खर्चाची मर्यादा 15 हजार होती ती वाढवून एक लाखापर्यंत करण्यात आली आहे तर कार्यशाळा व्यवस्थापनात यापूर्वी खर्चाची मर्यादा 45 हजारांपर्यंत होती ती मर्यादा वाढवून दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे आता एसटी गाड्या खाजगी कार्यशाळांमध्ये दुरुस्ती केल्याचे चित्र दिसल्यास नवल वाटणार नाही. त्याचबरोबर आता दुरुस्तीची सर्व यंत्रणा असणाऱ्या एसटी महामंडळाने खाजगी कार्यशाळेकडे जाण्याचा मार्ग पत्करल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे. 

-एसटीचा संचित तोटा 2829 कोटी

-एसटीकडील एकूण वाहने - 19016

-एकूण कर्मचारी - 101226

-एकूण आगारे - 250

-एकूण बसस्थानके - 609

-वार्षीक प्रवाशी संख्या - 245 कोटी

-दररोजचे प्रवाशी - 67 लाख

खासगीकरण वैगेर नसून शिवशाही गाड्यांसारख्या गाड्या आहेत. त्यांचे काही पार्ट आपल्याकडे नाहीत. त्यामुळे अशा वेळी मंजूरीला प्रत्येकवेळी प्रस्ताव मुख्यालयाकडे येवू नये म्हणून मंजूरीसाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे.
 
- रणजीतसिंह देओल, उपाध्यक्ष एसटी महामंडळ


संबंधित बातम्या

Saam TV Live