लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रातील या बदलामुळे विद्यार्थ्यांना मिळाली सूट...

साम टीव्ही
गुरुवार, 23 एप्रिल 2020

कोरोनाच्या कालावधीत मुंबईतील अनेक नामांकित संस्थांमधील शिक्षकांनी विविध अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरु केले आहे. त्यामध्ये 85 ते 90 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंद होत आहे. म्हणजेच ही पद्धती शिक्षक आणि विद्यार्थांना आवडलेली आहे.''

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, अध्ययन पद्धती बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थांना शिक्षणाचे अधिक स्वातंत्र्य मिळेल. त्यादृष्टीने विद्यापीठांनाही कारभार बदलावा लागणार आहे. लॉकडाऊनमध्ये शिक्षकांकडून सुरु असलेल्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील, असे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी, इंजिनिअरिंग आणि इतर शैक्षणिक अभ्यासक्रम कालबाहय ठरण्याची भिती निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर माजी कुलगुरूंनी शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांकडे लक्ष वेधले आहे.

आॅनलाईन शिक्षणाचे प्रमाण वाढणार

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. विजय खोले म्हणाल्या ''कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यापुढे यापुढे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शिक्षण उपलब्ध होईल. शिक्षक, विद्यार्थ्यांचाही याला चांगला प्रतिसाद मिळेल. कोरोनाच्या कालावधीत मुंबईतील अनेक नामांकित संस्थांमधील शिक्षकांनी विविध अॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरु केले आहे. त्यामध्ये 85 ते 90 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंद होत आहे. म्हणजेच ही पद्धती शिक्षक आणि विद्यार्थांना आवडलेली आहे.''

अभ्यासक्रम व परिक्षा पद्धतीत होणार बदल

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख म्हणाल्या, ''येत्या काळात अभ्यासक्रमात व परिक्षा पद्धतीत बदल करावा लागेल. येत्या काळात बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमाला महत्व येईल; मात्र सध्याचे अभ्यासक्रम कालबाह्य होणार नाहीत. त्यामध्ये बदल करावे लागतील आपल्याकडे आवश्‍यकतेप्रमाणे उपकरणे तयार होत नाहीत. यासाठी आयआयटीतील विद्यार्थांना प्रोत्साहित केले पाहिजे.'' आयआयटी आणि आर्किटेक्‍चरच्या अभ्यासक्रमात बदल व्हावेत, असे त्यांनी सांगितले.

...आता विद्यापीठांनीही बदलावे!

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर म्हणाले, ''जगात बदलांची सुरुवात गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु आहे. कोरोनानंतर आपल्याकडील अध्यापन आणि अध्ययन पद्धती बदलतील. कदाचित यापुढे विद्यार्थी शिक्षणासाठी सलग तीन वर्षे येणार नाहीत. ते एका वर्षासाठी येतील. नंतर अनुभव घेवून पुन्हा येतील. कारण आज तीन वर्षाचे शिक्षण संपल्यानंतर चौथ्या वर्षी ते कामी येईल काय, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्याप्रमाणे विद्यापीठाने परीक्षेचेच्या मूल्यमापनासह प्रशासनाची पद्धत बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांना शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळेल.''


संबंधित बातम्या

Saam TV Live