उदयनराजे यांनी दिल्या सुचना

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019


राजवाडा ते बोगदा रस्त्यावर प्रभागात कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ ठेकेदार कंपनीमार्फत खांबांवर एलईडी बल्ब बसविण्याचे काम सुरू होते. तेथे उदयनराजे पोहचले आणि त्यांनी कामाची पाहणी केली. 
 

सातारा : खाली उतर... हॅण्डग्लोज का घातले नाहीत... बल्ब चेक केले का... आता वर चढ... टेस्ट मारून दाखव...या सूचना कोणत्या पालिकेतील अथवा वीज कंपनीमधील अभियंत्याच्या नव्हेत किंवा सुपरवायझरच्या... प्रभाग क्रमांक 16 मध्ये चक्‍क माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीच त्या सूचना दिल्या आहेत.
 
राजवाडा ते बोगदा रस्त्यावर प्रभागात कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ ठेकेदार कंपनीमार्फत खांबांवर एलईडी बल्ब बसविण्याचे काम सुरू होते. दुपारी चारच्या सुमारास नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या उपस्थितीत हे काम सुरू होते. त्यावेळी अचानक एक सिल्व्हर कलरची कार थांबली. त्यातून उदयनराजे उतरल्याने उपस्थितांना धक्‍काच बसला.

ज्या शिडीवरून कामगार बल्ब लावण्यास वरती चढला होता. तेथे उदयनराजे पोचले. संबंधित कर्मचारी हॅण्डग्लोज न घालताच वरती चढला होता. ते पाहून उदयनराजेंनी त्या कर्मचाऱ्याला खाली उतरवले. हॅण्डग्लोज घातल्याशिवाय वरती चढायचे नाहीत, सुरक्षिततेचे उपाय करायचे, अशा अनेक सूचना देण्यास सुरूवात केली. उदयनराजेंनी कामगार किती आहेत, किती हॅण्डग्लोज आहेत, एलईडी बल्ब किती आहेत, किती वॅटचे आहेत, सर्वच चालू आहेत का, याची पाहणीही केली.

थांबा मीच शिडीवर चढतो, असे उदयनराजेंनी बोलताच सर्वजण आवाक्‌ झाले. त्यावेळी गर्दी वाढल्याने उदयनराजेंनी कामगारांना वरती चढण्यास सांगितले. शिवाय, इतरांना शिडी आवळून धरण्यासही सांगितले. बल्ब लावल्यानंतर टेस्ट मारून दाखव, असा मिश्‍किलपणे सल्ला दिल्याने उपस्थितींत हशा पिकला. त्यानंतर त्यांनी कामगारांना "ओके, काम चांगले आहे,' अशी शाब्बासकीची थापही दिली अन्‌ तेथून निघून गेले. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live