सुपर कॉपची एक्‍झिट ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय (वय 54) यांनी शुक्रवारी दुपारी दक्षिण मुंबईतील राहत्या घरी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त असल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. या आजारामुळे आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्वहस्ताक्षरातील पत्रात (सुसाइड नोट) म्हटल्याची माहिती मुंबई पोलिसांनी अधिकृतरीत्या दिली. 

मुंबई - अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय (वय 54) यांनी शुक्रवारी दुपारी दक्षिण मुंबईतील राहत्या घरी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त असल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. या आजारामुळे आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्वहस्ताक्षरातील पत्रात (सुसाइड नोट) म्हटल्याची माहिती मुंबई पोलिसांनी अधिकृतरीत्या दिली. 

हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास नरिमन पॉइंट मंत्रालयाजवळील "सुरुची' या इमारतीत त्यांच्या घरी आपल्या खासगी परवानाधारक पिस्तुलाने स्वत:च्या तोंडात गोळी मारली. गोळीचा आवाज ऐकून या वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसाने घरात धाव घेतली. त्यांनी लगेचच रॉय यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. रॉय यांच्या डोक्‍याच्या मागील बाजूस गोळी बाहेर पडल्याचे जखम स्पष्टपणे दिसत होते, अशी माहिती एका सूत्राने दिली. स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) रॉय यांनी महाराष्ट्र पोलिस दलातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते 2010 ते 2014 या कालावधीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त होते. या काळात रॉय यांनी आयपीएल स्पॉटफिक्‍सिंग सट्टेबाजी गैरव्यवहाराची चौकशी केली आणि आयपीएलचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मैयप्पन यांना अटक केली होती. इगतपुरी येथील बॉलिवूड अभिनेत्री लैला खान आणि तिच्या पाच नातेवाइकांच्या खुनाचा उलगडा केला होता. 

गुन्हे शाखेच्या कार्यकाळात रॉय यांना राज्य विरोधी दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) पाठविण्यात आले. त्यांनी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथील अमेरिकन शाळेत घातपाती कारवाई करण्याचा कट उधळून लावत एका माथेफिरू तरुणाला अटक केली होती. 

विविध जबाबदाऱ्या 
रॉय यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक (गृह निर्माण व पोलिस कल्याण) विभागातही काम केले होते. 1991 मध्ये मालेगावसारख्या महत्त्वाच्या ठिकाणावरून कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या रॉय यांनी 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण), नगरचे पोलिस अधीक्षक, उपायुक्त (मुंबई शहर), उपायुक्त (वाहतूक) यांच्यासह 2004-2007 या काळात नाशिकचे पोलिस आयुक्तपदही भूषवले होते. 

 

हिमांशू रॉय यांचे जाणे हे आम्हा सर्वांचे मोठे नुकसान आहे. ते खूप चांगले अधिकारी होते. त्यांनी गुन्हे शाखा व एटीएसमध्ये असताना उत्कृष्ट कामगिरी भूषवली. त्यांच्या कुटुंबीयांना अशा कठीण क्षणी देव सामर्थ्य देवो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 
- दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलिस आयुक्त. 

ही खूप धक्कादायक आणि दु-खद बातमी आहे. ते खूप चांगले अधिकारी व चांगले व्यक्ती होते. अशा घटनेचा कधी विचारही केला नव्हता. माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते. त्यामुळे हा माझ्यासाठी धक्का आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. 
- रश्‍मी शुक्‍ला, पुणे पोलिस आयुक्त. 

रॉय असे पाऊल उचलतील, असा कोणीही विचार केला नव्हता. ते पहिल्यांदा मुंबईत आले, त्यावेळी मी पोलिस आयुक्त होतो. त्यावेळी त्यांचा आत्मविश्‍वास पाहून मी त्यांच्यावर परिमंडळ-1 ची जबाबदारी सोपवली होती. 
- एम. एन. सिंग, माजी मुंबई पोलिस आयुक्त. 

हिमांशू रॉय हे सकारात्मक असलेले अधिकारी म्हणून पोलिस दलात परिचित होते. त्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांशी चांगले संबंध ठेवले. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी होती. प्रत्येक गुन्ह्यात लहानसहान गोष्टींवर त्यांची नजर असायची. मीडियाशी कशाप्रकारे संबंध ठेवावे, याबाबत त्यांनी आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. 
- प्रवीण पडवळ, अतिरिक्त आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग. 

हिमांशू रॉय यांचे मार्गदर्शन आम्हाला खूप लाभले. गुन्हा उघड झाल्यावर कौतुकाची थाप त्यांच्याकडून मिळायची. गुन्हा कसा उघड करावा, तांत्रिक अभ्यास कसा करावा, याचे सतत मार्गदर्शन व्हायचे. 
-ज्योत्स्ना रासम, वरिष्ठ निरीक्षक, वनराई पोलिस ठाणे. 

हिमांशू रॉय हे गुन्हे शाखेत सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. ते सर्वांशी मिळूनमिसळून वागत असायचे. त्यांनी कधीच कोणाला दुखावले नाही. चुका झाल्याच तर अशा पुन्हा चुका करू नका, असे ते सांगायचे. त्यांनी कधीच कोणाला शिक्षा दिली नाही. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. 
- नंदकुमार गोपाळे, पोलिस निरीक्षक. 

हिमांशू रॉय यांच्यासारखा अधिकारी नाही. त्यांच्या आत्महत्येने जबर धक्का बसला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा चांगला अनुभव होता. लैला खान हत्या प्रकरणात आमच्या टीमचे रॉय यांनी कौतुक केले होते. 
- दीपक फटांगरे, वरिष्ठ निरीक्षक, मालवणी पोलिस ठाणे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live