सुषमा स्वराज, एक कणखर नेतृत्व हरपलं

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

यशस्वी राजकारणी, कुशल संसदपटू आणि उत्तम प्रशासक असा त्रिवेणी संगम असलेल्या सुषमा स्वराज या पेशाने वकील होत्या. भारतीय जनता पक्षाबरोबर अखेरपर्यंत निष्ठावंत राहिलेल्या सुषमा स्वराज यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांना साथ देताना स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता.

यशस्वी राजकारणी, कुशल संसदपटू आणि उत्तम प्रशासक असा त्रिवेणी संगम असलेल्या सुषमा स्वराज या पेशाने वकील होत्या. भारतीय जनता पक्षाबरोबर अखेरपर्यंत निष्ठावंत राहिलेल्या सुषमा स्वराज यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांना साथ देताना स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता.

सात वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार अशी त्यांची कारकिर्द होती. राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-1 सरकारमध्ये त्या 26 मे 2014 ते 30 मे 2019 या काळात परराष्ट्रमंत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्यानंतर या पदावर नियुक्त झालेल्या त्या दुसऱ्या महिला मंत्री होत्या. भाजपने गेल्या काही वर्षांत अनेक दिग्गज नेते गमावले, त्यात आता सुषमा स्वराज यांची भर पडली आहे. 

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियानातील अंबाला कॅंटोन्मेंटमध्ये झाला. हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी यांच्या त्या कन्या. त्यांचे वडील हरदेव हे संघाचे कार्यकर्ते होते. अंबाल्यातील सनातन धर्म महाविद्यालयात सुषमा यांचे शिक्षण झाले. नंतर चंडीगडच्या पंजाब विद्यापीठात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. 1973 पासून सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून त्यांनी काम सुरू केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुषमा यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. त्यांचे पती स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्ती होते. 1977 ते 1982 व 1987 ते 1990 या काळात सुषमा स्वराज हरियाना विधानसभेच्या आमदार होत्या. 1977 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्या हरियानात मंत्री झाल्या. एवढ्या लहान वयात मंत्रिपद मिळालेल्या त्या एकमेव महिला होत. 

जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात त्या सक्रीय सहभागी झाल्या होत्या. नंतर सुषमा स्वराज यांची कारकिर्द भाजपमध्ये बहरली. दिल्लीचे मुख्यमंत्रिपदही त्यांनी सांभाळले होते. विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी अलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम केले. 2000 ते 2003 या काळातही त्यांनी हे मंत्रिपद सांभाळले. 2003 ते 2004 या काळात एनडीए सरकारमध्ये आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी सुषमा यांनी सांभाळली. त्यांच्या काळात त्यांनी सहा "एम्स'ची स्थापना केली. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्या परराष्ट्र मंत्री होत्या. अडचणीत सापडलेल्या परदेशस्थ भारतीयांना त्यांनी सदैव मदतीचा हात पुढे केला आणि सरकारची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ठामपणाने मांडली होती.

 

WebTitle :marathi news sushma swaraj five times mp and a best parliamentarian 


संबंधित बातम्या

Saam TV Live