नरेंद्र मोदींचा शपथविधी येत्या गुरूवारीच!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मे 2019

नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. मोदी यांच्यासह त्यांच्या भावी मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे, असे भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी नेत्यांकडून मोदी यांचे अभिनंदन करणारे दूरध्वनी आजही सुरू राहिले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा त्यात समावेश होता. 

नवी दिल्ली ः नरेंद्र मोदी येत्या 30 मे रोजी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. मोदी यांच्यासह त्यांच्या भावी मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे, असे भवनातर्फे जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, परदेशी नेत्यांकडून मोदी यांचे अभिनंदन करणारे दूरध्वनी आजही सुरू राहिले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा त्यात समावेश होता. 

राष्ट्रपती भवनातर्फे सूचित केल्यानुसार, 30 मे रोजी सायंकाळी सात वाजता मोदी व त्यांचे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पद व गोपनीयतेची शपथ देतील. मोदी यांची काल भाजप तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तो निर्णय राष्ट्रपतींना कळविण्यात आला. त्यानुसार राष्ट्रपतींनी काल राज्यघटनेच्या कलम 75 (1) अनुसार त्यांची पंतप्रधानपदी निवड करून सरकारस्थापनेसाठी निमंत्रण दिले. तसेच त्यांच्याबरोबरच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या सदस्यांची नावे कळविण्याची सूचना केली. आज राष्ट्रपती भवनातर्फे शपथविधीची तारीख व वेळ निश्‍चित करण्यात आली.

दरम्यान, परदेशी नेते व राष्ट्रप्रमुखांकडून मोदी यांचे अभिनंदन करणाऱ्या दूरध्वनींची मालिका आजही सुरू राहिली. त्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, मालदिवचे माजी अध्यक्ष महंमद नाशीद व नेपाळचे माजी पंतप्रधान माधवकुमार नेपाळ यांचा समावेश होता. या सर्वांनी मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीतील चमकदार यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

आतापर्यंत मोदी यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, भूतानचे राजे जिग्मे वांगचुक, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. 

आज अहमदाबादला जाण्यापूर्वी मोदी यांना आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी भेटले. रेड्डी यांच्या पक्षाला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळाला आहे. रेड्डी यांनी आंध्र प्रदेशला विशेष मदत योजना किंवा विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या सरकारला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव केलेला होता.

आजच्या त्यांच्या भेटीत त्यांनी आंध्र प्रदेशबाबत उदार आर्थिक धोरण ठेवण्याची विनंती पंतप्रधानांना केल्याचे सांगण्यात आले. राजकीय पातळीवर त्यांचा पक्ष (वायएसआर कॉंग्रेस) भाजपला पाठिंबा देणारा राहील, असेही त्यांनी सूचित केले. 

Web Title: Swearing Ceremony of Narendra Modi is on 30th May

 


संबंधित बातम्या

Saam TV Live