टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला.

 टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला.

हैदराबाद : ट्‌वेन्टी-20 मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात गाडी रुळावर आणली. भारताने शुक्रवारी झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. संथ खेळपट्टीवर केदार जाधवची फलंदाजी दमदार ठरली, तर महेंद्रसिंह धोनीची सहाय्यकाची भूमिका तोलामोलाची ठरली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला 236 धावांत रोखल्यानंतर भारताने हे आव्हान 48.2 षटकात पार केले. केदार जाधव (81) आणि धोनी (59) यांची 24.5 षटकातील नाबाद 141 धावांची भागीदारी भारताला विजयी पथावर आणणारी ठरली. धोनीने 71वे अर्धशतक करताना भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा मान मिळविला. पण योग्य वेळी आक्रमक झालेल्या केदारने विजय सोपा करून टाकला.

ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारताची सुरवातही निराशाजनक होती. शिखर धवनही फिंचप्रमाणे भोपळा फोडण्यापूर्वीच बाद झाला. त्या वेळी प्रथम रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी खराब चेंडूंनाच शिक्षा करण्याचे धोरण अवलंबले आणि संयमाला अधिक प्राधान्य दिले. ऍडम झॅम्पाला दोन चौकार मारणारा कोहली त्याच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर कल्टर नाईलने रोहितचा अडसर दूर केला. कर्णधार आणि उपकर्णधार लागोपाठ माघारी परतल्यावर झॅम्पाने रायडूचीही विकेट मिळवली. भारतीय संघ त्या वेळी 4 बाद 99 असा दडपणाखाली आला.

कठिण परिस्थितीत एकत्र आलेल्या धोनी आणि केदार जाधव यांच्यावर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी होती. ती त्यांनी चोख पार पाडली. अखेरची दहा षटके सुरु झाल्यावर आवश्‍यक धावांची सरासरी सहाची म्हणजेच चेंडू मागे एक धाव अशी झाली होती. परिस्थितीचा अंदाज आल्यावर या दोघांनी गिअर बदलले. केदारने गिअर बदलण्याबरोबर एक्‍सलेटरचाही वापर अचूक केल्यामुळे त्याचे अर्धशतक अगोदर झळकले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाला बुमराने आपल्या पहिल्याच षटकांत कर्णधार फिंचला ऑऊटस्विंगवर चकवले, परंतु त्यानंतर दुसऱ्या यशासाठी भारताला 20 षटके वाट पहावी लागली. बुमरा आणि शमी प्रभावी मारा करत असताना कोहलीने पहिला बदल म्हणून विजय शंकरला गोलंदाजी दिली आणि तेथेच उस्मान ख्वाजा- स्टोईनिस यांनी फायदा घेतला. जम बसवण्याबरोबर धावांचा वेगही त्यांनी वाढवण्यास सुरवात केली होती.

विजय शंकरप्रमाणे बदली गोलंदाज असलेल्या केदार जाधवने मात्र स्टोईनिसला बाद करून विराटचा विश्‍वास सार्थ ठरवला. लगेचच कुलदीप यादवने ख्वाजा अर्धशतकानंतर बाद केले. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांना वर्चस्व मिळवण्याची संधी मिळत असताना ग्लेन मॅक्‍सवेलने भारतीयांचे इरादे कमकूवत केले. ट्‌वेन्टी-20 मधील वर्चस्वपूर्ण फलंदाजी त्याने आजही सुरु केली. पण डावाच्या मध्यावर शमीला गोलंदाजी देण्याचे डावपेच यशस्वी ठरले. त्याने प्रथम टर्नर आणि नंतर मॅक्‍सवेलच्या यष्टी उडवल्या. त्या अगोदर कुलदीपने हॅंडस्‌कोम्बला माघारी धाडले होते. त्यामुळे 40 व्या षटकांत ऑस्ट्रेलियाची 6 बाद 173 अशी अवस्था झाली होती.

ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यामुळे त्यांचा डाव मर्यादित ठेवण्याची संधी भारतीयांना मिळाली, परंतु अलेक्‍स कॅरी आणि कल्टर नाईल यांनी केलेली भागीदारी भारताला अखेरच्या षटकातील एक चेंडू असेपर्यंत त्रास देणारी ठरली.

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया ः 50 षटकांत ः 7 बाद 236 (उस्मान ख्वाजा 50, मार्कस स्टोईनिस 37, ग्लेन मॅक्‍सवेल 40 -51 चेंडू, 5 चौकार, अलेक्‍स कॅरी नाबाद 36 -37 चेंडू, 5 चौकार, कौल्टर नाईल 28 -27 चेंडू, 3 चौकार, मंहमद शमी 2-44, बुमरा 2-60, कुलदीप यादव 2-46) पराभूत वि भारत ः (रोहित शर्मा 37 -66 चेंडू, 5 चौकार, विराट कोहली 44 -45 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, महेंद्रसिंग धोनी नाबाद 59 -72 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, केदार जाधव नाबाद 81 -87 चेंडू, 9 चौकार, 1 षटकार, कौल्टर नाईल 2-46, ऍडम झम्पा 2-46)

Web Title: Kadar Jadhav and Mahendra Singh Dhoni makes half century india wins

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com