शिवभोजनासाठी आता आधारकार्डची सक्ती...

शिवभोजनासाठी आता आधारकार्डची सक्ती...

मुंबई - १० रुपयात सकस आहार. विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने या थाळीची घोषणा केली. यानंतर यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील झालेलं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी स्वतःहून १० रुपयात थाळी योजना सुरु केली. अगदी जम्मू काश्मीरमध्ये देखील शिवसेनेकडून दहा रुपयात थाळीची योजना सुरु झालेली पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात देखील याबद्दल चर्चा झाली आणि प्रायोगिक तत्त्वावर १० रुपयात थाळीची योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला.

दहा रुपयांच्या थाळीची किंमत जवळपास ५० रुपये आहे. यातील दहा रुपये हे ग्राहकाकडून आणि उर्वरित ४० रुपयांचे अनुदान स्वरूपात राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती आहे. याच सबसिडीच्या मुद्द्यवरून विरोधकांनी मोठा आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.  अशातच आता पुन्हा एकदा या थाळीवरून मोठा वादंग निर्माण होणार आहे असं चित्र आहे. 

या दहा रुपयांच्या थाळीत ३० ग्रॅमच्या दोन पोळ्या, १०० ग्रॅम भाजीची वाटी, १५० ग्रॅम मूद असलेला भात आणि १०० ग्रॅम वरण यांचा समावेश असणार आहे. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला केवळ १० रुपयात शिवभोजन  थाळी उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यात ६ कोटी ४८ लक्ष खर्च अपेक्षित आहे. 

काय आहे नवीन नियम ?

महाराष्ट्र सरकारतर्फे रुपयात थाळीचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत तब्ब्ल १५ ठिकाणी ही योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र आता या थाळीसाठी आता आधार कार्डाची गरज भासणार आहे. याचसोबत तुम्हाला तुमचा फोटो देखील देणं बंधनकारक राहणार आहे. ही थाळी घेण्यासाठी एकप्रकारची फोटो आयडेंटिफिकेशन सिस्टीम लागू करण्यात येणार आहे अशी माहिती आता समोर येताना पाहायला मिळतेय.   

दरम्यान,  ही थाळी जर गरिबांसाठी आहे तर अशा प्रकारच्या अटी आणि शर्थी कशासाठी? असा सवाल आता विचारण्यात येतोय. सुरवातीला ३ महिने ही थाळी दहा रुपयात देण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबत अधिक माहिती घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 

Web Title: for ten rupees affordable shivbhojan thali aadhar card is mandatory

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com